बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST2019-02-19T00:08:17+5:302019-02-19T00:09:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे.

बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दंगा करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या तब्बल अडीचशे लोकांवर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही हा सोहळा पार पाडण्यासाठी नागरिकांनी नियोजन केले आहे. बीड शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दुपारी २ वाजता मिरवणूक काढली जाणार आहे. यासह जिल्हाभरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यासाठी बीड पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त नियूक्त केला आहे. गतवर्षी गोंधळ घालणारे व ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त मिरवणूक आणि इतर कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी आयोजन समित्यांनी नियोजन केले आहे. या समित्यांचे स्वयंसेवक देखील बंदोबस्तकामी असलेल्या पोलिसांना मदत करणार आहेत. जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
मिरवणुका अन् रॅली
जिल्हा विशेष शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यात ७७ ठिकाणी मोठ्या मिरवणुका निघणार आहेत.
तसेच ९ ठिकाणी दुचाकी आणि ४ ठिकाणी पायी रॅली काढण्यात येणार आहे. त्याचा बंदोबस्तही आहे.
फेटे, झेंडे असा काहीसा रूबाब शिवप्रेमींचा असणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून जाणार आहे.
बीडमध्ये पहिल्यांदाच शाळेची मिरवणूक
शिवजयंतीनिमित्त बीड शहरात प्रथमच टिष्ट्वंकलिंग स्टार स्कूलने मिरवणूक काढली. ढोल पथकाच्या प्रात्यक्षिकाने प्रेक्षकांना जिंकले. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवरायांसह मावळ्यांची वेशभूषा साकारली होती. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या मिरवणुकीतील विद्यार्थ्यांचे नागरिकांनी कौतुक केले.
असा असेल जिल्ह्यातील बंदोबस्त
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह ५ पोलीस उपअअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, ७५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, १०० महिला कर्मचारी, पुरूष होमगार्ड ३५०, महिला होमगार्ड १०० राज्य राखीव दलाची १ तुकडी व सीआरपीएफच्या ४ तुकड्या, तसेच नियंत्रण कक्षात १३ अधिकारी, ७६ पोलीस कर्मचारी, १ राज्य राखीव दलाची तुकडी, जलद प्रतिसाद पथक १, आरसीपी तुकडी १ असा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात असणार आहेत. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत. यासह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, जिल्हा विशेष शाखा हे सुद्धा बंदोबस्तासाठी रस्त्यावर दिसणार आहेत. प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.