बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 19:20 IST2023-08-16T19:16:39+5:302023-08-16T19:20:02+5:30
शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप
सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरएसमध्ये प्रवेश केलेले बीड येथील शिवराज बांगर यांनी बीआरएस भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.
बीआरएसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील अस्वस्थ मंडळींना गळ घालण्यासाठी काही एजंट नेमले असून हे एजंट आर्थिक आणि राजकीय आमिष दाखवून त्यांचे प्रवेश घडवून आणत आहेत, असा आरोप शिवराज बांगर यांनी केला आहे. बांगर यांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शिवराज बांगर पत्रकार परिषदेत म्हणाले की, प्रवेश देताना वेगळी भूमिका आणि प्रवेश दिल्यानंतर वेगळी भूमिका असे बीआरएसचे धोरण आहे. काही दिवसांचा अनुभव आल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रातील जनतेवर ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही वेळीच सर्वांना सावध करणार आहोत, असेही शिवराज बांगर यावेळी म्हणाले. दरम्यान शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवराज बांगर हे मुळचे तसे शिवसेनेचे आहेत. मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. वंचितमध्ये एकोपा आणि एकनिष्ठता नसल्याने शिवराज बांगर हे टिकू शकले नाहीत. ते मनसेत दाखल झाले. मनसेतून ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक होते. वरिष्ठ नेत्यांशी बोलणं देखील झालं होतं. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी हिरवा झेंडा देखील दाखविला होता. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे बांगर यांचा प्रवेश थांबविला गेला. त्यानंतर बांगर यांनी बीआरएस पक्षात दाखल झाले होते.