३ लाखांची उधारी वसूल करून परतणाऱ्या मुनिमास पाठलाग करून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:06 IST2022-07-12T15:05:04+5:302022-07-12T15:06:32+5:30
पाठीमागून आलेल्या एका कारने आदेशचा रस्ता त्रिमुर्ती पेट्रोलपंपाच्या जवळ अडवला.

३ लाखांची उधारी वसूल करून परतणाऱ्या मुनिमास पाठलाग करून लुटले
कडा (बीड): दुकानाची ३ लाख ११ हजार रुपयांची उधारी वसूल करून परतणाऱ्या तरुणाला कारमधून पाठलाग करत आलेल्या दोघांनी लुटल्याची घटना धामणगांव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ही घटना पाळत ठेवून झाल्याचा अंदाज असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
आष्टी तालुक्यातील आदेश गौतम बोखारे ( २३ रा. चोभानिमगाव ) हा तरूण कडा येथील पटवा सप्लायर्स या दुकानात कामाला होता. सोमवारी दुकान मालकाच्या सांगण्यावरून आदेशने खिळद, पांढरवाडीफाटा, अंमळनेर, धामणगांव येथे जाऊन उधारी वसूल केली. ३ लाख ११ हजार रूपये घेऊन आदेश दुचाकीवरून धामणगाव येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परत दुकानाकडे निघाला.
दरम्यान, पाठीमागून आलेल्या एका कारने आदेशचा रस्ता त्रिमुर्ती पेट्रोलपंपाच्या जवळ अडवला. कारमधील दोघांनी चाकूचा धाक दाखवून आदेशकडील ३ लाख ११ हजार रुपयाची रक्कम घेऊन पाबोरा केला. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर , सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.