अंबाजोगाईत वृद्ध महिलेच्या २१ हजारांच्या रकमेवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:44 IST2019-02-27T16:43:09+5:302019-02-27T16:44:13+5:30
पंधरा दिवसापूर्वी मुलीने घरखर्चासाठी दिली होती रक्कम

अंबाजोगाईत वृद्ध महिलेच्या २१ हजारांच्या रकमेवर डल्ला
अंबाजोगाई (बीड ) : शहरातील मोंढा भागातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या पर्समधील २१ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
शिवाबाई गोविंद जाधव ही वृद्ध महिला अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथे एकटीच राहते. पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या मुलीने घरखर्चासाठी म्हणून शिवाबाई यांना २१ हजार रुपये दिले होते. ही रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करण्यासाठी त्या मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोंढा भागातील महाराष्ट्र बँकेत आल्या होत्या. सदरील रक्कम आणि बँक पासबुक, गॅस कार्ड त्यांनी स्वतःजवळील पर्समध्ये ठेवले होते. यावेळी शिवाबाई यांचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २१ हजारांची रक्कम लंपास केली आणि पसार झाले. याप्रकरणी शिवाबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांवर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.