संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायालयातील पहिल्या सुनावणीस वाल्मीक कराड हात जोडून उभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:16 IST2025-03-12T16:15:04+5:302025-03-12T16:16:56+5:30

केजच्या जलदगती न्यायालयात आज सकाळी पहिली सुनावणी पार पडली

Sarpanch Santosh Deshmukh murder case; Walmik Karad stands with folded hands at the first hearing, when is the next date? | संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायालयातील पहिल्या सुनावणीस वाल्मीक कराड हात जोडून उभा

संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायालयातील पहिल्या सुनावणीस वाल्मीक कराड हात जोडून उभा

- मधुकर सिरसट

केज ( बीड) : राज्यभर गाजलेल्या मस्साजोग ( ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात बुधवारी सकाळी झाली. सुरक्षेच्या करणास्तव व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयासमोर ओळख परेडसाठी हजर करण्यात आले. यावेळी आरोपींच्या वकिलांनी जबाबचे पूर्ण कागदपत्रे मिळाले नाहीत, ते देण्यात यावे अशी मागणी केली. यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २६ मार्च रोजी होणार असल्याचा निर्णय न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी दिला.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरणं करुन त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकारणाचा तपास सीआयडी व एसआयटीने करुन ८० दिवसांत बीडच्या मकोका न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. तेथून हे दोषारोपपत्र केज येथील न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यानंतर आज, बुधवारी सकाळी ११:३० वाजता या प्रकरणाशी संबंधित सरपंच हत्या, खंडणी व अॅट्रॉसिटी या तीनही गुन्ह्यांच्या पहिल्या सुनावणीला सुरुवात झाली. प्रथमत: सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करुन ओळख परेड घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाच्या अतिजलद व मकोका न्यायालयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणी सुरू असताना न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे केज न्यायालयाबाहेर व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

वाल्मिक कराडने हात जोडले..
या प्रकारणातील सर्वं आरोपीना ओळख परेडसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायाल्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी या प्रकरणातील मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड हा हात जोडून उभा असल्याचे दिसून आले. दरम्यान, सरपंच हत्या प्रकरणातील फिर्यादी शिवराज देशमुख यांना यावेळी न्यायालयाने तुम्हाला दोषारोप पत्राची प्रत मिळाली आहे का? दाखल केलेल्या दोषारोप पत्रावर तुम्ही समाधानी आहात का? असे विचारले असता देशमुख यांनी सकारात्मक उत्तरे दिली.

वाल्मिक कराडचे वकील बदलले
या प्रकारणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यापासून अॅड. अशोक कवडे व अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी आतापर्यंत वाल्मिक कराडच्यावतीने न्यायालयीन कामकाज पाहिले होते. परंतु यावेळी कोल्हापूर येथील नामांकित विधिज्ञ अॅड. एस. एन. खाडे यांनी वाल्मिक कराडच्यावतीने सुनावणीत भाग घेतला. विष्णू चाटेच्यावतीने अॅड. राहुल मुंडे व  अॅड. सचिन शेप यांनी तर आरोपी क्रमांक 3 ते 7 च्या वतीने अॅड. अनंत मुंडे न्यायालयात हजर होते.

अॅड. उज्ज्वल निकम, सीआयडी व एसआयटी अधिकारी गैरहजर
विशेष सरकारी वकील म्हणून राज्यशासनाच्या वतीने नियुक्ती केलेले अॅड. उज्ज्वल निकम हे या प्रकरणातील पहिल्या सुनावणीला गैरहजर होते. पुढील सुनावणीला ते हजर राहणार असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी यावेळी दिली. दरम्यान, अॅड. निकम यांची भेट घेण्यासाठी देशमुख कुटुंबीय लवकरच मुंबईला जाणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. ते स्वतः सुनावणीसाठी केज न्यायालयात हजर होते. तसेच पहिल्या सुनावणीला सीआयडी व एसआयटीचे तपास अधिकारी देखील गैरहजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Sarpanch Santosh Deshmukh murder case; Walmik Karad stands with folded hands at the first hearing, when is the next date?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.