सरपंच, ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:08+5:302021-03-06T04:31:08+5:30
नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु ...

सरपंच, ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी
नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नसल्याची तक्रार करीत येथील दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून १ मार्च रोजी गैरहजर असलेले सरपंच व ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. नांदुरघाटमध्ये प्रथमच दिव्यांगांनी हे आंदोलन केले.
उपबाजारपेठ असलेल्या नांदुरघाट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नामधून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे आहे. परंतु आजपर्यंत हा निधी मिळाला नसल्याची तक्रार आहे. मग ग्रामपंचायतीला आजपर्यंत आलेला कर, लिलावातून मिळणारे उत्पन्न, घरपट्टी, नळपट्टी, विद्युत कर, मालमत्ता व इतर करातून जमा होणारी रक्कम नेमकी गेली कुठे? नियमाप्रमाणे ५ टक्के रक्कम दिव्यांगांना का वाटप झाली नाही, असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष पप्पू नाळपे व दत्ता आंधळकर यांनी केला. याबाबत पाठपुरावा केला असता १ मार्च रोजी काही प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रमुखांनी दिले होते. मात्र, कुठलीही हालचाल न झाल्याने ४ मार्च रोजी सर्व दिव्यांग ग्रामपंचायतीमध्ये गेले. तेथे सरपंच व ग्रामसेवक दोघेही गैरहजर असल्याने आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन करून सरपंच व ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
ग्रामसेवकाची टाळाटाळ, सरपंच गेले जीपवर
दोन दिवसांपासून ग्रामसेवक फक्त येतोच म्हणतात. पण येत नाहीत. तर सरपंच म्हणाले, त्यांना जीप भाडे आल्याने ते येऊ शकत नाहीत. आमचे निवेदन स्वीकारायला कोणीच पदाधिकारी नसल्यामुळे आम्ही खुर्चीला हार घालून आंदोलन केले. लवकरच सर्व दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहेत.
- विशाल नाळपे, सर्कल अध्यक्ष, प्रहार संघटना.
ऑफिसचे काम असल्यामुळे केजला जाणे जरूरीचे होते. बीड येथून मी थेट केजला गेलो. नांदुरघाटला आल्यानंतर त्यांच्या निवेदनाचे पाहू.
- भगवान सिरसाट, प्रभारी ग्रामसेवक
नांदुरघाटमध्ये नोंदणीकृत ७७ दिव्यांग आहेत व काही लोकांची नोंद राहिली आहे. त्यांना कोणतेच काम होत नाही. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या करांमधून त्यांना थोडा फार आधार मिळू शकतो. परंतु तो देण्यास टाळाटाळ होत आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही न्याय मिळवून घेणारच.
- दत्ता आंधळकर, उपाध्यक्ष, प्रहार नांदुरघाट