आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:51 IST2024-12-29T12:49:32+5:302024-12-29T12:51:59+5:30
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी स्पष्टच सांगितलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश दिले. या कारवााईवरुन आता सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान', असं कुटुंबीयांनी म्हटले आहे.
संपत्ती जप्ती आदेशावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, पहिल्या दिवसापासून आम्ही न्याय द्या सांगत आहे. आता सगळा महाराष्ट्र हा न्याय मागत आहे.काल झालेल्या मूक मोर्चामध्ये आम्हाला न्याय देण्याची मागणी केली आहे. काल आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, पण संपत्ती जप्त करून कुणाचेही समाधान होणार नाही. त्यांना शिक्षा दिल्यानंतरच समाधान होणार आहे. त्यांच्या संपत्तीचं आम्हाला काही घेणे देणे नाही, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
"दमानिया यांनी काल आरोपींची हत्या झाली हे सांगितलं. ते तपासण्याचे काम पोलिसांचे आहे.आरोपींकडे मोठ्या गाड्या आहेत.हे त्यांनी कष्टातून मिळवलेले नाही. त्यांना कोणीतरी प्रलोभन देऊन दिलेले आहे. गुन्हेगारीसाठी हे सर्व कोणीतरी त्यांना दिले आहे. ही सर्व संघटीत गुन्हेगारी आहे. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. फरार आरोपींनी लवकरात लवकर शरण यावे, यासाठी तपास यंत्रणा दबाव वाढवित असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून स्पष्ट झाले.
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना असा आदेश शनिवारी दिला की बंदुकीसह ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.