संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडसोबत त्याचे साथीदारही म्हणाले, मालमत्ता जप्ती नको
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:10 IST2025-07-08T12:01:07+5:302025-07-08T12:10:02+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरण : दोषमुक्ती अर्जावर २२ जुलैला निकाल, कराडला नाशिक जेलमध्ये हलविणार का?

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडसोबत त्याचे साथीदारही म्हणाले, मालमत्ता जप्ती नको
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्ती व मालमत्ता जप्ती अर्जासंबंधी २२ जुलै रोजी न्यायालय आपला निकाल देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सोमवारी दिली. कराड याचा दोषमुक्ती, प्रॉपर्टी अटॅचच्या अर्जासह इतर आरोपींनीसुद्धा त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये, असे विनंती अर्ज न्यायालयास सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सोमवारी दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी कराड याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद मकोका कायद्यात असल्याचे सांगितले. यावर कराड याचे वकील विकास खाडे म्हणाले की, प्रॉपर्टी आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. या प्रॉपर्टी कंपनी व इतर लोकांच्या जॉइंट प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज गुन्ह्यामधून मिळविलेल्या नाहीत, त्यामुळे त्याचा व गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत. काही खाते व स्थावर मालमत्ता आहेत, त्याचाही या गुन्ह्याशी संबंध नसल्याची भूमिका ॲड. खाडे यांनी न्यायालयासमोर मांडली.
कराडला नाशिक जेलमध्ये हलविणार का?
वाल्मीक कराड यास नाशिक कारागृहात हलविले जात असल्याबाबत विचारणा केल्यावर ॲड. खाडे म्हणाले, ही बाब प्रशासनाच्या अखत्यारित असून, त्यावर भाष्य करता येणार नाही. तसेच इतर कारागृहात स्थलांतर करण्यासंदर्भात आम्ही अर्ज केला नाही व आमच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नसल्याचे ते म्हणाले. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, कराड यास कोणत्या तुरुंगात ठेवणे अधिक सुरक्षित राहील याबाबत तुरुंग प्रशासन निर्णय घेईल. अशा प्रकारचा कुठलाही अर्ज आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे विचारणा केली नाही.