वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:59 IST2025-03-12T10:59:51+5:302025-03-12T10:59:51+5:30
आवादा कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबातून माहिती उघड

वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी
बीड :वाल्मीक कराड याने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. फोनवरून न ऐकल्याने ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह गुंडांना तेथे पाठविले; परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट झाले आहे.
सुनील केदू शिंदे (४२, रा. नाशिक, ह. मु. बीड) हे आवादा एनर्जी प्रा. लि. या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांनी १३ जानेवारी रोजी सीआयडीला जबाब दिला.
'तो' कॉल केला रेकॉर्ड म्हणे, ...तर याद राखा
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी चाटे याने कॉल केला. 'तुमच्याशी अण्णा बोलणार आहेत', असे सांगून त्यांच्याकडे फोन दिला. त्यावेळी कराड म्हणाला की, 'ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, काम चालू कराल तर याद राखा. त्याचे रेकॉर्डिंग मी केले. त्याच दिवशी दुपारी एक वाजता घुले आमच्या ऑफिसमध्ये आला. 'तुम्हाला काम चालू करायचे असेल तर वाल्मीक कराडची भेट घ्या, तोपर्यंत काम चालू करू नका, नाही तर तुम्हाला त्रास होईल,' अशी धमकी दिल्याचेही जबाबात म्हटले आहे.
जबाबात म्हटले, खंडणीत अडथळा म्हणूनच खून
संतोष देशमुख हे ६ डिसेंबर २०२४ रोजी मदतीला आले होते; परंतु तेच खंडणीत अडथळा ठरल्याने ९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी देशमुख यांची अपहरण करून हत्या केल्याचे शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे.
'प्लांट सुरू ठेवायचा असेल तर २ कोटी रुपये द्या'
२८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी कराडचा फोन आला. बाहेरील व्यवहार शिवाजी थोपटे हे पाहत असल्यामुळे तो त्यांच्याकडे दिला. कराड याने 'तुम्ही परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा', असे म्हणाल्याचे सांगितले. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता कराडचा फोन आला.
'तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या,' असे तो म्हणाला. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी थोपटे, कराड, विष्णू चाटे यांच्यात परळी येथील जगमित्र कार्यालयात भेट झाली. यात कराड याने थोपटे यांना 'प्लांट सुरू ठेवायचा असेल तर २ कोटी रुपये द्या.
नाही तर जिल्ह्यात कोठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही,' अशी धमकी दिली. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले आवादा कंपनीत आला. 'वाल्मीक अण्णांनी मागितलेले २ कोटी रुपये दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही,' अशी धमकी दिली.