बीडचे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; तपास अधिकारी स्वप्नील राठोड बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:37 IST2025-04-24T12:34:32+5:302025-04-24T12:37:32+5:30

कळंबचे उपअधीक्षक संजय पवार करणार तपास

Sakshi Kamble suicide case; Investigating officer Swapnil Rathod changed | बीडचे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; तपास अधिकारी स्वप्नील राठोड बदलले

बीडचे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; तपास अधिकारी स्वप्नील राठोड बदलले

बीड : बीडमधील साक्षी कांबळे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून धाराशिवमध्ये मामाच्या घरी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी बीडमध्ये येऊन कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी धाराशिवचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडून तपास काढून घेत तो कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्याकडे दिला आहे. तसेच राठोड यांची चौकशी लावल्याचीही माहिती आहे.

साक्षी कांबळे (वय २०, रा. बीड) या मुलीने बीडमधीलच अभिषेक कदम याच्या त्रासाला कंटाळून १४ मार्च रोजी धाराशिव येथे मामाच्या घरी आत्महत्या केली. याच मुलीचा विवाह २० एप्रिल रोजी होणार होता. १९ एप्रिल रोजी आई कोयना विटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र देऊन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कोयना यांची भेट घेतली. त्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणात डीवायएसपी राठोड यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर बुधवारी लगेच राठोड यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला.

साक्षीच्या आईची एसपींकडे धाव
साक्षीची आई कोयना यांनी बुधवारी दुपारी बीडचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली. बीडमधील इतर काही प्रकरणांचीही त्यांनी माहिती कोयना यांना दिली. या प्रकरणातील आरोपींसह यापूर्वी झालेल्या घटनांचीही चौकशी करावी, अशी मागणी कोयना यांनी एसपींकडे केली आहे. चौकशी करू, असे अश्वासन त्यांनी दिल्याचेही कोयना यांनी सांगितले.

नियोजित नवरदेवालाही नोटीस
आरोपींना जामीन झाल्यानंतर साक्षीच्या आईने आवाज उठविला. त्यानंतर डीवायएसपी राठोड यांनी साक्षीचा ज्या मुलासोबत साखरपुडा झाला होता, त्यालाही नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच इतर साक्षीदारांनाही नोटीस बजावली आहे. राठोड हे तपास करायचा सोडून त्रासच देत असल्याचा आरोप कोयना यांनी केला आहे.

Web Title: Sakshi Kamble suicide case; Investigating officer Swapnil Rathod changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.