चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:29 IST2025-10-31T07:29:20+5:302025-10-31T07:29:37+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना फोनवरून धीर दिला

चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
वडवणी (बीड) : महिला आयोगाचे म्हणणे हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही, तसेच या घटनेतील ज्यांची ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांना एकालाही सोडले जाणार नाही आणि मी लवकरच भेटायला येणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना फोनवरून धीर दिला.
फलटण येथे आत्महत्या केलेल्या सरकारी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांची उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अजित पवार गटाच्या महिला प्रवक्त्या रूपाली ठोंबरे आणि काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी कुटुंबीयांशी मोबाईलवरून संपर्क साधला. रूपाली ठोंबरे यांनीदेखील रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. महिला आयोगाचे म्हणणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणणे नाहीये, या मताशी महिला म्हणून आम्ही सहमत नाही, असे सांगत यासंदर्भात अजित पवारांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उद्धव ठाकरे यांचाही कुटुंबीयांशी संवाद
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोनवरून पिडीतेच्या कुटुंबीयांना आधार दिला. शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि मृत डॉक्टर मुलीला न्याय मिळवून देणारच, अशा शब्दात त्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले. सुषमा अंधारे यांनी बंददाराआड कुटुंबीयांशी सुमारे तासभर चर्चा करून काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले. तपासासंदर्भात केलेल्या प्रमुख मागण्या दोन तारखेपर्यंत मान्य न झाल्यास फलटण पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही अंधारे यांनी यावेळी दिला.