नियम सर्वांना सारखाच; बीडमध्ये चक्क न्यायाधीशांना २०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:24+5:302021-06-01T04:25:24+5:30
बीड : कार चालविताना सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी चक्क एका न्यायाधीशांना २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई ...

नियम सर्वांना सारखाच; बीडमध्ये चक्क न्यायाधीशांना २०० रुपये दंड
बीड : कार चालविताना सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी चक्क एका न्यायाधीशांना २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हवालदार जालिंदर बनसोडे यांनी केली. नियम सर्वांना सारखाच असल्याचे दाखवित बनसोडे यांनी कर्तव्यातील प्रामाणिकतेचा परिचय दिला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरत असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. जे लाेक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, तसेच विनाकारण बाहेर फिरल्याची खात्री पटते, अशांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. अशीच नाकाबंदी सोमवारी सकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू होती. पोलीस हवालदार जालिंदर बनसोडे हे येथे कर्तव्यावर होते. बसस्थानकाकडून येणारी चारचाकी वाहने त्यांनी अडविली. चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यांनी सर्व कागदपत्रांची विचारपूस केल्यावर ती दाखविण्यात आली. परंतु, सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी २०० रुपये पावती फाडण्याबाबत त्यांनी सांगताच समोरील व्यक्तीने आपले ओळखपत्र दाखविले. यात ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असल्याचे समजले. परंतु, बनसोडे यांनी नियम सर्वांना सारखाच आहे. असे सांगत २०० रुपये चलन ऑनलाईन टाकले. यावर संबंधित न्यायाधीशांनीही हा दंड रोख स्वरूपात भरला. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपअधीक्षक संतोष वाळके यांचा फोन लागला नाही, तर शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले.
नियम सर्वांना सारखाच आहे. स्वत:चे ओळखपत्र दाखविले तरी सीट बेल्ट नसल्याने १३८ (१) १७७ या नियमांतर्गत २०० रुपये दंड आकारण्यात आला.
जालिंदर बनसोडे, पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड