गरिबांच्या खिशावर दरोडा! २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडोंची मालमत्ता
By सोमनाथ खताळ | Updated: February 17, 2025 12:21 IST2025-02-17T12:20:08+5:302025-02-17T12:21:57+5:30
भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते.

गरिबांच्या खिशावर दरोडा! २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडोंची मालमत्ता
बीड : गलेलठ्ठ पगार असतानाही प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गरिबांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. याच लाचखोरीच्या पैशांतून ११ वर्षांत २६० जणांनी करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. कायदे कडक केले जात असले तरी भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले आहे.
रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेण्यापासून ते लाखो, करोडाे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आतापर्यंत राज्यात अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. नियमांत आणि फुकटात होणाऱ्या कामांसाठीही अधिकारी, कर्मचारी सामान्यांकडून लाच घेत आहेत. काही समजदार लोक याची तक्रार करतात. त्यामुळेच हे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते. जास्त संपदा आढळल्यानंतर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो.
२०२५ मध्ये १३२ मासे गळाला
जानेवारी व १३ फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९३ कारवाया झाल्या. यात १३२ मासे गळाला लागले आहेत. पैकी वर्ग १ चे ९, वर्ग २ चे १६ यांचा समावेश आहे. यामध्ये २८ लाख ४० हजार ४९५ रुपये लाच रक्कम जप्त केली आहे. कारवायांमध्ये महसूल, भूमी अभिलेख व नोंदणी अव्वल असून पोलिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
२०२४ मध्ये ३ कोटी जप्त
२०२४ या वर्षात एसीबीने राज्यभरात ६९३ कारवाया करून १ हजार २ आरोपींना पकडले. त्यांच्याकडून ३ कोटी १८ लाख २४ हजार ४१० रुपयांची लाच रक्कम जप्त केली. यामध्ये केवळ वर्ग १ च्या ६२ अधिकाऱ्यांकडून ५८ लाख २६ हजार रुपये जप्त केले होते.
अपसंपदा म्हणजे काय?
एखादा लोकसेवक लाच घेताना पकडला जातो. त्यानंतर त्याची परवानगी घेऊन उघड चौकशी केली जाते. यात वेतन, व्यवसाय यांसह इतर सर्वांची मालमत्ता व रोख रक्कम यांची गोळाबेरीज केली जाते. उत्पन्न व खर्च जाऊन उरलेली रक्कम ही अपसंपदा म्हणून गृहीत धरली जाते.
अपसंपदेचा गुन्हा
लाचेची कारवाई झाल्यानंतर उघड चौकशी केली जाते. त्यात उत्पन्न व खर्च यांचा हिशोब जुळला नाही तर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो.
- शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी, बीड
अशी आहे आकडेवारी
गुन्ह्याचा प्रकार - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४
सापळा - १२४५ - १२३४ - ९८५ - ८७५ - ८९१ - ८६६ - ६३० - ७६४ - ७२८ - ७९५ - ६८३
अपसंपदा - ४८ - ३५ - १७ - २२ - २२ - २० - १२ - ७ - १२ - १२ - ३१