घरफोडी दरम्यान चोरट्यांचा कुटुंबावर हल्ला; एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:05 IST2020-01-20T13:34:55+5:302020-01-20T14:05:07+5:30
जखमीवर पवनवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरफोडी दरम्यान चोरट्यांचा कुटुंबावर हल्ला; एक जण गंभीर जखमी
कडा : घरफोडी करून पलायन करताना कुटुंबातील सदस्यांनी अडविण्याचाप्रयत्न करताच चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. १९ ) पहाटे तालुक्यातील डोईठाण येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोईठाण येथे रविवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी द्वारका विठ्ठल खाडे यांच्या घरात प्रवेश केला. द्वारका खाडे यांच्या खोलीत प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने लुटले. या दरम्यान, द्वारकाबाई यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने शेजारील खोलीत झोपलेला त्यांचा मुलगा पवन, सून व मुलगी जागी झाली. पवन याने खोलीबाहेर येत पलायन करणाऱ्या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केले. द्वारकाबाई यांनीही चोरट्यांची गाडी खाली पाडल. यानंतर चोरट्यांनी धारदार चाकूने पवनवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यात पवन गंभीर जखमी झाला. यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. जखमी पवनवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी द्वारका विठ्ठल खाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात चोरटय़ांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारी पहाटे याच गावात गंगाराम फुलमाळी यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला तर दुसर्या वस्तीवर चव्हाण यांच्या घरातून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे दागिने पळवले. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एकाच दिवशी डोईठाण येथे तीन ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरोडा प्रतिबंधक, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस अशा तीन पथकाच्या माध्यमातून तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सलिम पठाण यांनी दिली आहे.