चोरीतील दुचाकी, किंमती ऐवज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत; बीड पोलिसांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:41 IST2018-08-31T18:40:33+5:302018-08-31T18:41:34+5:30
चोरीस गेलेल्या दुचाकी शोधून त्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमात परत करण्याचा उपक्रम मराठवाड्यात सर्वप्रथम बीड पोलिसांनी हाती घेतला आहे.

चोरीतील दुचाकी, किंमती ऐवज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत; बीड पोलिसांचा उपक्रम
बीड : चोरीस गेलेल्या दुचाकी शोधून त्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमात परत करण्याचा उपक्रम मराठवाड्यात सर्वप्रथम बीडपोलिसांनी हाती घेतला आहे. तसेच चोरीतील इतर किंमती मुद्देमालही फिर्यादींना परत करण्यात आला. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
गत काही दिवसांपासून बीड पोलिसांकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. गतवर्षीपासून चोरी, दरोडा, घरफोडी यामध्ये चोरी गेलेला किंमती ऐवज शोधून तो सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे फिर्यादींना परत करण्याचा उपक्रम बीड पोलिसांनी हाती घेतला होता. प्रत्येक महिन्याला हा उपक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडतो. गुरुवारीही असाच कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मात्र किंमती मुद्देमालासह चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या दुचाकी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. ११ गुन्ह्यातील ४ लाख ६२ हजार ७४८ रुपयांचा किंमती ऐवज परत केला. तसेच जालना, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी यासह बीड जिल्ह्यात विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या ४५ पैकी २३ दुचाकी संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आल्या. इतर दुचाकी मालकांचा शोध घेऊन त्या परत करण्यात येतील, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती होती. यापुढेही असेच कार्यक्रम घेण्यात येतील असे श्रीधर म्हणाले. श्रीहरी मुंडे, शेख मुज्जमील शेख बाबामियाँ यांनी पोलिसांबद्दल मनोगत व्यक्त केले. सुरेश केंद्रे, बळीराम पांचाळ, भानुदास गावडे, मारुती जोगदंड, विकास देशमुख यांनी श्रीधर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपोनि दिलीप तेजनकर यांनी केले. पो.ह. यादव, सिरसाट यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.