व्याज सोडा मुद्दलही अडकली; निवृत्त नायब तहसीलदाराकडून मुक्ताई अर्बनवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 20:00 IST2025-02-03T19:57:15+5:302025-02-03T20:00:15+5:30
निवृत्त नायब तहसीलदाराची २३ लाखांची फसवणूक; 'मुक्ताई अर्बन'च्या वीस जणांवर गुन्हा

व्याज सोडा मुद्दलही अडकली; निवृत्त नायब तहसीलदाराकडून मुक्ताई अर्बनवर गुन्हा दाखल
माजलगाव ( बीड): येथील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या नायब तहसीलदारांची २३ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त नायब तहसीलदार घाटूळ यांच्या तक्रारीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर शिंदे यांच्यासह २० जणांविरूध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
माजलगाव शहराजवळील मंगरूळ नं. १ येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर गणपतराव घाटूळ हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. याबाबत येथील मुक्ताई अर्बन को.ऑ. क्रे. सो. जुना मोंढा शाखेतील चेअरमन व कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त व्याजाचे आमिष देत त्यांच्याशी संपर्क वाढवला. मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतरांनी जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या होत्या. माञ, घाटुळ यांना पैशाची गरज पडल्याने त्यांनी वारंवार रक्कमेची मागणी केली. मात्र, रक्कम देण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. २३ लाख रूपयांची रक्कम व्याजासह परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार घाटूळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणी दामोदर घाटुळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास निवृत्ती सौंदर, भागवत संभाजी गंगाञे, विशाल श्याम गोरे, केशव साहेबराव जोगडे, स्वाती विठ्ठल सक्राते, जनाबाई अनंतराव कदम, अशोक रतन चिगुरे, मोतीराम केशव शिरसाट, परमेश्वर लक्ष्मण कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सकारात्मक, विठ्ठल संक्राते, उद्धव केशव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके, रमेश दगडूबा यादव, रुस्तुम काळे या वीस जणांवर फसवणुकीसह विविध कलमाने माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय केरबा माकने हे करत आहेत.