फेरफार प्रलंबित, मंडळ अधिकारी निलंबीत; बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:18 IST2025-03-07T19:18:18+5:302025-03-07T19:18:40+5:30
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्रलंबित फेरफारची संख्या जास्त असल्याने केली कारवाई

फेरफार प्रलंबित, मंडळ अधिकारी निलंबीत; बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
बीड: फेरफार प्रलंबित ठेवून शासकीय कामकाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, या प्रकरणी बीड तालुक्यातील लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक गोरख डरफे यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शासन सेवेतून निलंबीत केले आहे.
५ मार्च रोजी गेवराई येथे प्रलंबित फेरफारबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रलंबित फेरफारबाबत मंडळनिहाय आढावा घेण्यात आला असता बीड तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक डरफे यांच्याकडे ५६ फेरफार प्रलंबित असल्याचे दिसून आले. सदरील प्रलंबित फेरफारबाबत डरफे यांना विचारणा केली असता त्यांनी मोघम स्वरुपाचे उत्तर दिले. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्रलंबित फेरफारची संख्या जास्त असल्याने अशोक डरफे यांना बैठकामध्ये वारंवार सूचना देऊनही त्यांनी ५६ फेरफार प्रलंबित ठेवले.
शासकीय कामकाजात अक्ष्यम दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी न ठेवता गंभीर स्वरुपाची बाब आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, चा नियम ३ नुसार गैरवर्तन ठरते. अशोक डरफे यांच्या गैरवर्तनाचे गांभीर्य विचारात घेऊन ५ मार्च रोजी पासून निलंबीत करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी पाठक यांनी दिला आहे. निलंबन कालावधीत परळी तहसील हे मुख्यालय देण्यात आले असून सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच अशोक डरफे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.