‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:23 IST2018-12-28T00:23:06+5:302018-12-28T00:23:49+5:30

ठेवी गोळा करून गुंतवणूकदारांना करोडांचा गंडा घालणाऱ्या ‘मैत्रेय’च्या अध्यक्षासह संचालकांची संपत्ती विक्री केली जाणार आहे.

Relief for 'Maitreya' investors | ‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांना दिलासा

‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांना दिलासा

ठळक मुद्देठेवी परत देण्याच्या हालचाली : अध्यक्ष, संचालकांच्या संपत्तीचा होणार लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ठेवी गोळा करून गुंतवणूकदारांना करोडांचा गंडा घालणाऱ्या ‘मैत्रेय’च्या अध्यक्षासह संचालकांची संपत्ती विक्री केली जाणार आहे. या पैशांतून गुंतवणूकदारांना ठेवी परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
मैत्रेय कंपनीच्या माध्यमातून साखळी पद्धतीने एजंट नेमून त्यांना कमिशनचे आमिष दाखवून नाशीकच्या वर्षा सत्पाळ आणि इतर संचालक मंडळाने हजारो कोटींच्या ठेवी जमा केल्या. या ठेवून घेऊन ते सर्वच फरार झाले. बीड जिल्ह्यातही सुमारे २०० कोटी रूपयांच्या ठेवी होत्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हाही दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. यामध्ये पोलिसांनी ठेवीदार गुंतवणूक हित संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) कारवाई प्रस्तावित केली होती.
तपासात अध्यक्ष व संचालकांची संपत्ती कोठे आहे, याची माहिती जमा करण्यात आली. ही संपत्ती विक्री करून मिळालेले पैसे गुंतवणूकदारांना परत केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यादृष्टीने कारवाईही केली जात असल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकणात वर्षा सत्पाळ, प्रसाद परुळेकर, लक्ष्मीकांत नार्वेकर, भरत मैय्यर, नितीन चौधरी, विजय तावरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होता. यातील लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे यांना बीड पोलिसांनी अटक करुन त्यांची चौकशी केली होती.
हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती
मुंबई, कोकण, नाशिक व राज्यात इतर ठिकाणी ५२ ठिकाणी त्यांची संपत्नी आढळून आली असून तिची किंमत हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता ठेवीदारांना या संपत्तीच्या लिलावातून मिळणारा पैसा देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याची हालचाल सुरु झाली आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत बीड जिल्ह्यात फसवणूक झालेल्या सुमारे ६०० ठेवीदारांचे कागदपत्रे जमा करुन त्यांचे जबाब नोंद केले आहेत.

Web Title: Relief for 'Maitreya' investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.