प्लॉटचा ताबा देण्यास नकार; दहा ग्राहकांची पोलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:00 IST2019-06-20T00:00:00+5:302019-06-20T00:00:27+5:30
१९९३ मध्ये घेतलेल्या प्लॉटचा ताबा देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा प्लॉटधारकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली

प्लॉटचा ताबा देण्यास नकार; दहा ग्राहकांची पोलिसांत धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १९९३ मध्ये घेतलेल्या प्लॉटचा ताबा देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा प्लॉटधारकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली. यानंतर धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये मंत्री राम शिंदे यांच्या चुलत सासºयाचा समावेश आहे.
माजी सैनिक बबन गाडेकर (रा. धानोरा रोड, बीड) यांच्यासह आनंद नारायण भोंडवे, अमोल नारायण भोंंडवे, अयोध्या बबन गाडेकर, महादेव माणिक पारखे, श्रीधर मुरली करपे, रंजना हुनमंत काळे, उज्ज्वला कालिदास पानपट, संदीपान देवराव शिंदे, शिवाजी एकनाथ जोशी यांनी बीड शहराजवळील घोसापुरी शिवारात १९९३ साली प्लॉटची खरेदी केली होती. प्लॉटचे मूळ मालक बाबूराव खनाळ हे होते. खनाळ यांना मुलगा नसून दोन मुली आहे. त्यांचे जावई अंगद अप्पाराव मुसळे हे सासरे खनाळ यांचा व्यवहार पाहत होते. गाडेकर यांच्यासह इतरांनी मुसळे यांच्याशी पैशांचा व्यवहार करुन प्लॉट खरेदी केले होते. २८ डिसेंबर १९९३ रोजी व्यवहाराचे खरेदीखतही झाले. ७५ हजार रुपयांमध्ये हे प्लॉट घेतले होते. काही जणांच्या नावांची सातबाºयावर नावेही आली आहेत. मात्र, अनेकांनी खरेदीनंतर या प्लॉटचा ताबाच घेतला नव्हता. काही दिवसांपासून ते ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. बुधवारी ज्यांनी प्लॉट खरेदी केले ते सर्व ताबा घेण्यासाठी गेले होते. मुसळे याने प्लॉटचा ताबा देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी सैनिक बबन गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन मुसळेंविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.