अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:06+5:302021-03-17T04:34:06+5:30
बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. एम. व्ही. मोराळे यांनी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले.
प्रकरणाची हकीकत अशी की, बीड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बीड येथेच राहणारा लव ऊर्फ राहुल चांदणे याने बलात्कार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली होती. तिने एका मुलास जन्मही दिला होता. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीने पेठ बीड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपी राहुल चांदणे याच्याविरुद्ध कलम ३७६ भादंवि व कलम ३,४, ५(जे) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पेठ बीड पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. बनकर यांनी प्रकरणाचा तपास करुन बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हे प्रकरण बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. एम. व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे तसेच विशेष सरकारी वकील अॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लव ऊर्फ राहुल चांदणे यास कलम ३७६ (२) व कलम ४ पोक्सो अंतर्गत दोषी धरून त्यास कलम ४ पोक्सो कायद्या अंतर्गत २० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच कलम ५०६ (२) भादंविमध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. मंजुषा एम. दराडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बिनवडे व महिला पोलीस शिपाई नागरगोजे यांनी सहकार्य केले.