बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:01 IST2022-02-25T17:00:13+5:302022-02-25T17:01:32+5:30
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे,पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती
बीड : - बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आजीमाजी आमदारांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राजेश्वर चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासूनचे सदस्य असून खा. पवार यांचे निष्ठावंत मानले जातात. या पूर्वी म्हाडाचे सदस्य, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषवली आहेत. राजेश्वर चव्हाण यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. दरम्यान, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी, खा. शरद पवार यांचे विचार जोपासत जिल्ह्यात पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करत, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंद देशमुख, युवती आघाडीच्या अध्यक्ष सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती.