बीडच्या आणखी जवळ आली रेल्वे; आष्टी ते अंमळनेर मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:24 IST2024-01-05T19:23:12+5:302024-01-05T19:24:15+5:30
अंमळनेरकरांनी अनुभवला रेल्वेत बसण्याचा अनुभव

बीडच्या आणखी जवळ आली रेल्वे; आष्टी ते अंमळनेर मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी
- नितीन कांबळे
कडा: बीड जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या बीड-नगर-परळी रेल्वेबाबत आणखी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. नगर ते आष्टी या मार्गानंतर आता आष्टी ते अंमळनेर या तीस किलोमीटरच्या मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे. आज दुपारी या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली. यामुळे आता बीडच्या आणखी जवळ रेल्वे आली आहे.
आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी यशस्वी झाली. रेल्वे दाखल झाल्याने अंमळनेरकरांनी आनंद व्यक्त केला. रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने अनेकांनी बोगीत बसून फोटो काढले. रेल्वे पाहण्यासाठी अंमळनेरसह परिसरातील ग्रामस्थांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. आता येथून बीडचे अंतर ७० किमीच राहिले असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंद पसरला आहे.
दरम्यान, अंमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वे पाहण्यासाठी लोकांची वाढती गर्दी पाहता व त्या ठिकाणी काही अनूसुचित प्रकार ,घटना घडू नये म्हणून अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे बारकाईने लक्ष होते. रेल्वेमुळे अंमळनेरचे नाव आता देशाच्या पर्यटन मार्गावर आल्याने वैभवात भरच पडल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.