बीडमध्ये कुंटणखाण्यावर छापा; झारखंड, पश्चिम बंगाल, मुंबईच्या आठ महिलांची सुटका
By सोमनाथ खताळ | Updated: January 30, 2024 21:12 IST2024-01-30T21:11:52+5:302024-01-30T21:12:11+5:30
दोन ग्राहकही पकडले : धिरजकुमार बच्चू यांच्या पथकाची कारवाई

बीडमध्ये कुंटणखाण्यावर छापा; झारखंड, पश्चिम बंगाल, मुंबईच्या आठ महिलांची सुटका
बीड : परराज्यातील महिलांना बीडमध्ये आणून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या आंटीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. माजलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी धिरजकुमार बच्चू यांच्या पथकाने कुंटणखाण्यावर छापा मारून तब्बल आठ महिलांची सुटका केली. ही कारवाई बीड शहरातील पांगरी रोडवरील शाहुनगर भागात मंगळवारी रात्री साडे वाजेच्या सुमारास केली. यामध्ये दोन ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सोजरबाई होणाजी खंडागळे (वय ७० रा.शाहुनगर, बीड) असे पकडलेल्या आंटीचे नाव आहे. सोजरबाई ही आपल्या राहत्या घरीच कुंटणखाणा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे मंगळवारी रात्री पोलिसांनी दोन डमी ग्राहक पाठवून या कुंटणखाण्याचा पर्दाफाश केला. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंडसह मुंबईतील महिलांची सुटका केली. तसेच चिंचवण व ईट येथील दोन ग्राहकांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक के.बी.माकणे, हवालदार ए.ए.नामदास, ए.एस.देशमुख, पी.डी.ढगे, एस.बी.थापडे, के.एस.कानतोडे, गणेश नवले आदींनी केली.