शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तूर्त लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:09 IST2019-03-24T00:08:57+5:302019-03-24T00:09:36+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तूर्त लांबणीवर
बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हांतर्गत बदल्यांबाबत प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मॅपिंगच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया सुरु असतानाच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभागाने या बदल्या तूर्त स्थगित केल्याचे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर बदल्यांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात मागील वर्षी शिीकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत रॅन्डम राउंडमुळे जवळपास ५०० शिक्षक विस्थापित झाले होते. तर या वर्षी ३ वर्षांची सेवा अट घातल्याने व्सिथापित शिक्षकांना एकूण चार वर्षे बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्त बदली प्रक्रिया स्थगित असलीतरी ती सुरु झाल्यानंतर किमान ५०० बदल्या अपेक्षित आहेत. जिल्ह्यात ९ हजार ७६० शिक्षक आहेत.