पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद (फोटो)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST2020-12-26T04:26:55+5:302020-12-26T04:26:55+5:30

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी व कुशल नियोजनातून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन कृषी विधेयके लागू करण्यात आली ...

Prime Minister Narendra Modi's online dialogue with farmers (photo) | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद (फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद (फोटो)

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी व कुशल नियोजनातून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन कृषी विधेयके लागू करण्यात आली आहेत. स्वामीनाथन कृषी आयोगाच्या शिफारसींचा सर्वंकष विचार करून नवीन ३ कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू करण्यात आले; परंतु दुर्दैवाने काही राजकीय शक्तींनी संभ्रमावस्था निर्माण करून देशातील शेतकरी बांधवांमध्ये संशय व अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. शुक्रवारी कृषी कायद्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी ऑनलाइन पंतप्रधान मोदी व कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

नवीन कायद्यांविषयी शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. यामुळे देशातील विशिष्ट भागातील शेतकरी गत ३० दिवसांपासून रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करत आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजप सरकार विरोधक राजकारणाचा डाव खेळत आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली; परंतु कधीही शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊल उचललेले नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे अमलात आणले. हा निर्णय विरोधकांच्या जिव्हारी लागला आहे. केवळ राजकीय असूयेपोटी या कायद्याविषयी संशय निर्माण करण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारकडून शंका दूर करण्याचा प्रयत्न केला गेला, कृषी कायद्यात संशोधन करण्याची तयारी केंद्र सरकारने स्वीकारली; परंतु कायदेच रद्द करा, अशी आडमुठी भूमिका स्वीकारून आंदोलनकर्त्यांनी पेच निर्माण केला आहे. हा पेच शेतकरी बांधवांच्या हितासाठी बाधक आहे. शेतकऱ्यांनी कायदा समजून घ्यावा, असे आवाहन खा. डॉ. मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीदेखील भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून कृषी कायद्यासंदर्भात संभ्रमावस्था दूर करणार आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या माध्यमातून संभ्रमावस्था दूर होऊन शेतकरी संपावर निश्चितपणे तोडगा निघेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शेतकरी व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

भाजपातर्फे २५ डिसेंबर सुशासन दिन

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून खा. मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशातील ९ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार करोड रुपये जमा करण्यात आले. याचवेळी ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

Web Title: Prime Minister Narendra Modi's online dialogue with farmers (photo)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.