उचलीचे पैसे देण्याचा बहाणा; ऊसतोड कामगार महिलेवर मुकादमाकडून अत्याचार
By सोमनाथ खताळ | Updated: March 31, 2023 18:54 IST2023-03-31T18:53:53+5:302023-03-31T18:54:51+5:30
पीडितेने कशी तरी सुटका करत घर गाठले.

उचलीचे पैसे देण्याचा बहाणा; ऊसतोड कामगार महिलेवर मुकादमाकडून अत्याचार
वडवणी : तालुक्यातील एका ऊसतोड मजूर महिलेला ऊसतोडणीची उचल देतो असे सांगून लाॅजवर बोलावून घेतले. नंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी दुपारी वडवणी शहरातील एका लॉजवर घडली. याप्रकरणी मुकादमाविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने मुकादम मुंजा रतन वाघमारे याला फोन करत पुढच्या वर्षीसाठी ऊसतोडणीची उचल म्हणून पैसे देण्याची मागणी केली. यावर मुंजा वाघमारे याने तिला वडवणीला ये, असा निरोप दिला. वडवणीत आल्यावर कॉल केल्यानंतर त्याने एका लॉजचा पत्ता दिला. यावेळी तिच्याच गावातील दत्ता गायकवाड ही व्यक्ती खाली होती. त्याने पीडितेच्या चार वर्षांच्या मुलीला स्वत:जवळ ठेवत, मुकादमाकडून पैसे घेऊन खाली आल्यावर मुलीला घेऊन जा, असे सांगितले.
त्याप्रमाणे पीडिता पैसे आणण्यासाठी गेली असता दुसऱ्या मजल्यावर थांबलेल्या मुंजा वाघमारे याने तिच्यावर अत्याचार केला, तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने कशी तरी सुटका करत घर गाठले. पतीसह नातेवाइकांना हा प्रकार सांगितल्यावर रात्री वडवणी पोलिस ठाणे गाठले. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता मुंजा वाघमारे याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास माजलगावचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.