स्वातंत्रपुर्व काळातील शिरूर ग्रामपंचायत निवडणूक चावडीत झाली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:37+5:302021-01-09T04:27:37+5:30

विजयकुमार गाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : १९३७ साली स्थापना असलेल्या शिरूर ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक ही स्वातंत्रपूर्व काळात ...

The pre-independence Shirur Gram Panchayat elections were held in Chawdi | स्वातंत्रपुर्व काळातील शिरूर ग्रामपंचायत निवडणूक चावडीत झाली होती

स्वातंत्रपुर्व काळातील शिरूर ग्रामपंचायत निवडणूक चावडीत झाली होती

विजयकुमार गाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : १९३७ साली स्थापना असलेल्या शिरूर ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक ही स्वातंत्रपूर्व काळात झाली होती. त्या निवडणुकीचा निकाल लिखित स्वरूपात गावच्या चावडीत तत्कालिन महालदार यांनी वाचून जाहीर केला होता. सरपंच म्हणून राहिलेल्या पाटलाचा रूबाबही काही न्याराच असल्याचा त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्य म्हणून उमेदवारच नसल्याने महिला सदस्यपद रिक्त असल्याचे निकाल पत्रावरून दिसून येते. त्याही काळी गावगाडा कारभारी निवडताना सर्वसमावेशकता असल्याचे दिसून येते. १९४१मध्ये शिरूर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या प्रक्रियेसाठी मतदान घेतले की, एकविचाराने गावकारभारी निवडले गेले हे उमगत नसले तरी जवळपास ८० वर्षांपूर्वीदेखील गाव कारभारात सर्वसमावेशकता दिसून येते. त्याकाळात उपलब्ध समाजाला स्थान दिले गेले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काही नंतरच्या कालावधीपर्यंत गाव कारभारी म्हणून गावचे पोलीस पाटलांना प्रथम मानकरी समजले जात होते. पाटलांची शब्दरेषा कोणी ओलांडण्याचे धाडस करत नसायचे. त्याशिवाय मालेपाटील आणि कारभारी पाटील हे सुध्दा तोलामोलाचे मानले जात होते. त्याकाळच्या परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता, ही निवडणूक मतदानावर आधारित नसावी बहुधा ती सर्वसंमतीनेच पार पडून निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसवली असावी, असा अंदाज बांधला जातो.

दिनांक २० जानेवारी १९४१ यादिवशी साध्या कागदावर निवडून आलेल्या इसमाचे नाव शाईपेन आधारे लिहून दोन रकान्यात निकाल जाहीर केला होता. त्यात प्रथम एक राखीव जागा महिलांसाठी होती. मात्र, स्त्री उमेदवार कोणी उभा नाही, असे लिहिले. पुढे मुस्लिम, हरिजन प्रत्येकी एक आणि नंतर इतर सर्वसाधारणमध्ये आठ असे अकरा सदस्य निवडले गेले होते. शिरूर हे गाव त्यावेळी कोणत्या तालुक्यात होते, याचा संदर्भ यात दिसून येत नसला तरी ते नगर जिल्ह्यात होते, असे जुने लोक सांगतात.

शिरूर ग्रामपंचायत निवडणूक २० जानेवारी ४१

निवडून आलेल्या इसमाचे नाव शेख बसीर जाणूभाई, महादू येदू बोराडे तर इतर सर्वसाधारणमध्ये भाऊ व्यंकोजी गाडेकर, मारूती नारायण तळेकर, धोंडीराम नामदेव तळेकर, सखाराम रामचंद्र गाडेकर, दत्तात्रय पंढरीनाथ कुलकर्णी, बन्सीलाल हरकचंद, लखिचंद रामचंद लोढा व भगवान रंगनाथ काटकर असे उमेदवार निवडून आल्याचे चावडीत महालकरी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले होते.

पहिले सरपंच म्हणून भाऊराव पाटील राहिले होते. लखिचंद रामचंद लोढा व भगवान रंगनाथ काटकर हे देखील सरपंच राहिले असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडणूक, त्याकाळच्या गावकारभाऱ्यांचा रुबाब व गावकारभार सांभाळण्याचे कसब यात आणि आताच्या निवडणूक व कार्यशैलीत भरपूर अंतर असल्याचे जाणवल्याशिवाय राहात नाही.

Web Title: The pre-independence Shirur Gram Panchayat elections were held in Chawdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.