किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:19 IST2024-08-30T16:18:24+5:302024-08-30T16:19:27+5:30
पोलिसांनी यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
परळी: दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या ग्रीस, ऑइलचे बनावट उत्पादन करणाऱ्या बसवेश्वर कॉलनी येथील एका घरात सुरू असलेल्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या बीड आणि परळी शहर पोलिसांनी २८ ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाच वाजता छापा मारला. याप्रकरणी पोलिसांनी रियाज रहीम शेख ( रा. बसवेश्वर कॉलनी) यास अटक केली. यावेळी छाप्यामध्ये ७ लाख ८२ हजार ८५ रुपये किमतीचे बनावट ग्रीस, ऑइल, कच्चा माल जप्त करण्यात आले आहे.
बसवेश्वर कॉलनी येथील एका घरात वाहनांसाठी लागणाऱ्या ग्रीस, ऑइलचे बनावटरीत्या उत्पादन करण्यात येत असल्याची ग्रुप माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हा शाखा बीड येथील पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस जमादार विष्णू सानप आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गट्टूवार, पोलीस जमादार गीते, येलमटे व गोविंद भताने यांच्या पथकाने बसवेश्वर कॉलनी येथील कारखान्यावर २८ ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाच वाजता धाड टाकली. यावेळी येथे बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. त्यासाठी वापरण्यात येत असलेले केमिकल, बनावट ग्रीस, ऑइलचा मोठा साठा पोलिसानी जप्त केला. तसेच पोलिसांनी रियाज रहीम शेख यास अटक केली आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी आरोपीविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ऑइलच्या डब्यावर वाळूज, एमआयडीसी औरंगाबाद व बकेटवर समता कॉलनी, एमआयडीसी परळी असा पत्ता दाखविलेला आहे. परंतु या संदर्भातील मूळ कागदपत्रे आरोपीने पोलिसांना दाखविले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
-विष्णू सानप जमादार , स्थानिक गुन्हा शाखा बीड