"खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही..."; बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्याची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:20 IST2025-01-06T08:16:21+5:302025-01-06T08:20:04+5:30
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

"खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही..."; बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्याची बदली
MP Bajarang Sonawane:बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधलं राजकारण तापलं असतानाच पोलीस दलातूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. अशातच बीडमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बजरंग सोनवणेंबाबत वादग्रस्त पोस्ट केल्यान खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही, असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. बीडच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी हजाराची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असा मेसेज केला होता. बीड पोलीस प्रेस ग्रुप नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गणेश मुंडे यांनी हा मेसेज केला होता. त्यानंतर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर खासदार सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत गणेश मुंडे आणि सह पोलीस निरीक्षक दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती.
बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे म्हटलं जात आहे. गणेश मुंडे यांची पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधील पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट करण्यात आली होती.
जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणारी नाही, या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. त्यानंतर या पोस्टबाबत पत्रकारांनी विचारले असता गणेश मुंडे यांनी डिलिट केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना ग्रुपमधून काढून टाकले.
यानंतर रविवारी पुण्यामध्ये आयोजित जन आक्रोश मोर्चामधील भाषण करताना बजरंग सोनवणे यांनी गणेश मुंडेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. "प्रेस घे माझं काय उघड पडायचंय पडू दे तू प्रेस घे," असं आव्हान बजरंग सोनवणे यांनी दिले. यानंतर गणेश मुंडे यांनी थेट पुण्यात बदली करण्यात आली आहे.