पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:27 IST2023-03-28T19:26:42+5:302023-03-28T19:27:33+5:30
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत.

पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे
परळी : छत्रपती संभाजीनगर येथील 26 मार्चच्या जाहीर सभेत आपल्या विषयी अर्वाच भाषेत टीका केल्याबद्दल आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही मात्र आपण पोलिसांना दोष देत नसून गृहमंत्र्याचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार ,गुलाबराव पाटील यानंतर आता आमदार संजय शिरसाठ हे राजकारणातील महिला नेत्यावर टीका करीत आहेत. परंतु या प्रकरणी पोलीस गुन्हे दाखल करीत नाहीत त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी येथे बोलताना केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत परळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे ,शहर प्रमुख राजेश विभुते अतुल दुबेयांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.