संदल मिरवणुकीत कर्तव्य बजावताना पोलीस अंमलदाराचा मृत्यू
By संजय तिपाले | Updated: September 29, 2022 23:46 IST2022-09-29T23:46:05+5:302022-09-29T23:46:32+5:30
शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय ३५) असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

संदल मिरवणुकीत कर्तव्य बजावताना पोलीस अंमलदाराचा मृत्यू
बीड: शहरातील प्रसिद्ध शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला. अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही हृदयद्रावक घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली.
शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय ३५) असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१२ मध्ये पोलीस दलात अंमलदार म्हणून भरती झालेले शेख अन्वर यांनी वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजावले. सध्या ते दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होते. पेठ बीड हद्दीत २९ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणूक निघाली होती. यावेळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. यात शेख अन्वर यांचाही समावेश होता.
डीजेच्या दणदणाटासह निघालेली मिरवणूक रात्री ८ वाजता शहेंशाहवली दर्गा परिसरात आली. यावेळी अचानक शेख अन्वर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने जालना रोडवरील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना वाचविण्यात यश आले नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने शेख अन्वर यांचा मृत्यू झाल्याचचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
खासगी दवाखान्यात उपअधीक्षक संतोष वाळके, पेठ बीडचे पो. नि. हेमंत कदम यांनी धाव घेतली. शेख अन्वर यांचे वडील देखील पोलीस दलात होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शहेंशाहवली दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.
सहकाऱ्यांना अश्रू अनावर, मित्रपरिवार हळहळला
दरम्यान, कर्तव्यावर असताना शेख अन्वर यांचा मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. संदल कार्यक्रमात सहभागी नागरिक देखील हळहळले. त्यांच्या कुटुंबासह मित्रांनाही या बातमीने धक्का बसला. दवाखान्यात मोठी गर्दी झाली होती.