पोलिस समोरून आले जुगारी पाठीमागील दरवाज्यातून पळाले; परळी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:38 IST2025-02-08T18:29:50+5:302025-02-08T18:38:57+5:30
जुगार अड्डा चालक आणि जुगारी असे कोणीच हाती लागले नाही पण तीन लाख २३ हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले

पोलिस समोरून आले जुगारी पाठीमागील दरवाज्यातून पळाले; परळी तालुक्यातील घटना
परळी (बीड) : तालुक्यातील धर्मापुरी येथील बस स्थानक रोडवर एका इमारतीमध्ये मोबाईलवर ऑनलाईन कल्याण मुंबई नावाचा जुगार चालू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यावरून परळी ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागल्याने जुगारी पाठीमागील दरवाजातून पसार झाले. तेवढ्यात समोरील दरवाजातून पोलिस दाखल झाले. जुगारी हाती लागले नाही, पण पोलिसांनी यावेळी तीन लाख २३ हजार रुपये ८० रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी पहाटे जगन्नाथ फड ,शिवाजी पांचाळ, अक्षय सावंत ( राहणार धर्मापुरी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारपर्यंत यातील एकाही आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी; धर्मापुरी येथील बस स्थानकाजवळ एका इमारतीमध्ये मुंबई -कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेलविला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार पोलीस उपनिरीक्षक रियाज शेखलाल, निमोणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वाले ,पोलीस कर्मचारी चेमटे, वाहन चालक महादेव वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी सात फेब्रुवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र, पोलीस पथक आल्याचे समजताच जुगार चालक आणि जुगारी पाठीमागील दरवाज्यातून उड्या टाकून पळून गेले. त्यामुळे एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.
दरम्यान, पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य व दोन प्रिंटर, एक लॅपटॉप ,रोल्स मशीन एलईडी टीव्ही, वाय-फाय राऊटर ११ खुर्च्या, तीन टॅब दोन मोबाईल असा एकूण तीन लाख २३ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे करीत आहेत. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे गेला काही दिवसापासून जुगार चालू होता. शुक्रवारच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.