Police arrest two suspected thieves | दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद
दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

ठळक मुद्देगेवराई पोलिसांची कारवाई : एसटी महामंडळाचे १४ लाख रुपये चोरण्याचा केला होता प्रयत्न; पोलीस अधीक्षकांची माहिती

बीड : ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून लुटणारे तसेच गेवराई येथील एसटी महामंडळाची १४ लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांनी गजाआड केले अहेत. ही कारवाई गेवराई पोलिसांनी केली अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शहर पोलीस ठाण्यातील पत्रकारपरिषदेत सोमवारी दिली.
दत्तात्रय काशीनाथ काळे (रा. गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर) हे ट्रकचालक २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतून ट्रक (केए ०१- एजे-२१९३) चेन्नईला माल घेऊन जात होते. यावेळी महामार्गावरील नागझरी शिवारात ते आराम करण्यासाठी एका पेट्रोल पंपाजवळ थांबले. याच दरम्यान दुचाकीवरुन तोंडाला बांधून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून चालक काळे व क्लिनर माने (रा. वडझरी, ता. पाटोदा) यांच्याकडून रोख ४१ हजार रुपये व पाचशे रुपये किंमतीची चांदीची पाच ग्रॅमची अंगठी, ४ हजार किंमतीचे ब्रासलेट हिसकावून घेतली होते.
याप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पुढील तपास सहायक निरीक्षक एस. ए. काळे हे करत होते. त्यांनी या प्रकरणातील तपासाला गती दिली. खबऱ्याच्या माहितीनुसार कारवाई करत गुन्ह्यातील सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते (रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) व गणेश दत्तात्रय गोरे (रा. शिवाजीनगर, कोल्हेर रोड, गेवराई) यांना २ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून अंगठी, ब्रासलेट हस्तगत केले आहे. त्यांचा अन्य एक साथीदार मात्र, फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
जिल्ह्यामध्ये मागील काही काळात घरफोड्या, जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने चोरटे जेरबंद झाल्यामुळे इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कौतुक केले.
याच चोरट्यांनी केला होता १४ लाख लुटण्याचा प्रयत्न
गेवराई पोलिसांनी पकडलेल्या सागर बाप्ते व गणेश गोरे या चोरट्यांकडून आणखी काही चोºया केल्या आहेत का याची माहिती पोलिसांनी घेतली.
यावेळी २९ जुलै एसटी महामंडळाची जवळपास १४ लाख रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली.
त्यादिवशी एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रदीप नागलगोने हे गेवराई आगारात जमा झालेली ही रोकड असलेली बॅग घेऊन दुचाकीवरुन स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये जमा करण्यासाठी जात होते.
यावेळी शिवसेना कार्यालयाजवळ दुचाकीवरुन तीन तरुण कोयत्यासह पाठलाग करत आले होते. त्यांनी नागलगोने यांच्यावर हल्ला करीत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, नागलगोने यांनी प्रसंगावधान राखत बॅग घेऊन शिवसेना कार्यालयात धाव घेतली. यामुळे चोरांचा प्रयत्न फसला होता. ही चोरी करण्याचा प्रयत्न करताना देखील आणखी एक साथीदार त्यांच्यासोबत होता. याची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा तपास सफौ एस.आर. ऐटवार यांनी केला.

Web Title: Police arrest two suspected thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.