शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:13 IST2019-06-19T00:12:23+5:302019-06-19T00:13:19+5:30
पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले.

शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले. जखमी मोर सध्या तागडगावातील ‘सर्पराज्ञी’ पुनर्वसन केंद्रात सृष्टी सोनवणे यांच्या निगराणीखाली असून त्याला पॅरालिसिस झाल्याने सध्या तो पाय धरत नसला तरी उपचारानंतर पूर्ववत होईल अशी खात्री वन्यजीव अभ्यासक सिध्दार्थ सोनवणे यांनी दिली.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातल्या पूर्वेला कापली नदीच्या काठावर असलेल्या विहिरीत मोर पडला असल्याचे दिसून आले. त्यांनतर बाबासाहेब सव्वासे, दत्ता विनायक सुतार, विजू थोरात,राजू ढवाण, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र गाडेकर, अमोल अंगावर, संतोष अघाव, तुकाराम कातखडे, नारायण थोरात, मच्छिंद्र राजगुडे यांनी मोराला विहिरीबाहेर काढले.
सतीश मुरकुटे यांनी या मोराला ‘सर्पराज्ञी’ केंद्रावर नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या सृष्टी सोनवणे या लक्ष ठेवून आहेत तर त्याच्या पायाचा व्यायाम सुरू असून तो लवकरच पूर्ववत होईल. नंतर त्याला वनराईत पुन्हा सोडून देण्यात येईल, असे सोनवणे म्हणाले. मुलांनी केलेल्या कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.