मरणयातना, स्ट्रेचरविना नातेवाईकांनाच उचलावे लागते रुग्णाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:31+5:302021-02-05T08:27:31+5:30
रिॲलिटी चेक बीड : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आजारापेक्षा इलाजच जालीम वाटू लागला आहे. येथे आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. ...

मरणयातना, स्ट्रेचरविना नातेवाईकांनाच उचलावे लागते रुग्णाला
रिॲलिटी चेक
बीड : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आजारापेक्षा इलाजच जालीम वाटू लागला आहे. येथे आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. स्ट्रेचरही उपलब्ध नसते. त्यामुळे चक्क नातेवाईकांनाच उचलून अथवा झोळी करून रुग्णालयात शरीक करावे लागत आहे. याचा त्रास रुग्णांना होत आहे, असे असतानाही रुग्णालय प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते.
जिल्हा रुग्णालयात दररोज किमान ५०० ते ८०० पेक्षा जास्त ओपीडी असते. यात अपघात, ह्रदयविकाराचा झटका, छातीत दुखणे असे गंभीर आजाराचे रुग्णही असतात. परंतु ते आल्यानंतर वेळेवर स्ट्रेचर उपलब्ध नसते. स्ट्रेचर असले तर कर्मचारी नसतात. कर्मचारी असले तरीही स्ट्रेचरला हात लावत नाहीत. त्यामुळे घाबरलेले नातेवाईक, मित्र तात्काळ त्या रुग्णाला स्वत:च उचलून घेऊन जातात. दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायचे असेल तर झोळीचा वापर करावा लागतो. हा प्रकार वारंवार समोर आलेला असतानाही रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकारीही केवळ बघ्याची भूमिका घेऊन काहीतरी उपाययोजना करू, असे राजकीय नेत्यांसारखे अश्वासने देतात. परंतु, प्रत्यक्षात याचा त्रास सामान्य रुग्णांना होत आहे. स्ट्रेचर उपलब्ध करण्यासह कर्मचाऱ्यांनाही योग्य त्या सूचना करून यात सुधारणा करावी व सामान्य रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
म्हणे, फोटो काढायला परवानगी घ्या
जिल्हा रुग्णालयातील या गलथान कारभाराचे वास्तव समोर आणण्यासाठी लोकमतने सोमवारी दुपारी स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला उचलून नातेवाईक घेऊन जातानाचे छायाचित्र टिपले. यावेळी येथील एका कर्मचाऱ्याने असे फोटो काढू नका. वरिष्ठांची परवानगी घ्या, असा सल्ला दिला. हाल झालेच नसते तर फोटो काढायची वेळच आली नसती. रुग्णालय प्रशासन आणि अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यानेच असे फोटो काढून प्रकार समोर आणण्याची वेळ येत आहे. मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अधिकाऱ्यांनी विरोध करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून सुधारणा करण्याची गरज आहे.
कोट
स्ट्रेचर किती आहेत, याची माहिती घ्यावी लागेल. आतमध्ये गेल्यावर कर्मचारीच रुग्णाला ने-आण करतात. एखाददुसऱ्यावेळेस कर्मचारी नसल्यावर असा प्रकार होत असेल.
डॉ.सुखदेव राठोड
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड