रुग्णालयाबाहेरील झाडाला रुग्णाने गळफास घेतला, खिशातून मोबाइल पडला अन् जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:39 IST2025-05-10T13:38:43+5:302025-05-10T13:39:29+5:30
सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगद वर उचलल्याने वाचले प्राण,मात्र प्रकृती गंभीर असल्याची माहिती

रुग्णालयाबाहेरील झाडाला रुग्णाने गळफास घेतला, खिशातून मोबाइल पडला अन् जीव वाचला
बीड : उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अपघात विभागाच्या समोरील झाडाला रुमालाने गळफास घेतला. लटकताच खिशातील मोबाइल खाली पडला अन् लोकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्याला वाचविले. त्यानंतर अपघात विभागात दाखल करून उपचार केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला. गळफास घेण्याचे कारण मात्र, समजू शकले नाही.
नामदेव रगडे (अंदाजे वय ४०, रा. वांगी, ता. बीड) असे या रुग्णाचे नाव आहे. नामदेव हे शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात आले. अपघात विभागासमोरच जुने वडाचे झाड आहे. त्या ठिकाणी ते काही वेळ थांबले. याच झाडाखाली रुग्णांचे नातेवाईक जेवण करतात. तसेच सावली असल्याने गप्पा मारत असतात. त्यामुळे येथे कायम गर्दी असते. ही गर्दी कमी होताच नामदेव यांनी संरक्षक भिंतीच्या बाजूने झाडावर चढले. आपल्या गळ्यातील भगवा रूमाल फांदीला बांधला. फांद्यामुळे ते कोणाला दिसले नाही. त्यानंतर गळफास लावून लटकताच ते थोडे आडवे झाले आणि वरच्या खिशातील मोबाइल खाली पडला. बाजूच्या लोकांनी जाऊन पाहिल्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगद वर उचलले. इतर लोकांनी मदत करून गळ्याचा फास काढत त्यांना खाली उतरवत अपघात विभागात दाखल केले. त्यांच्यावर अपघात विभागातच उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
सीएस, एसीएसचीही धाव
गळफासाची माहिती समजताच ऑनलाइन बैठकीत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शहाणे, डॉ. एल.आर. तांदळे, डॉ. हनुमंत पारखे यांनी धाव घेतली. अपघात विभागातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे रगडे यांना जीवदान मिळाले. काही वेळ अपघात विभागातच उपचार केल्यानंतर आयसीयू विभागात दाखल करू, असे आरोग्य विभागाने सांगितले.