अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:28+5:302021-03-17T04:34:28+5:30

अंबेजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत ...

Participation of various organizations in the hunger strike movement | अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग

अन्नत्याग आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग

अंबेजोगाई : १९ मार्च, १९८६ पासून देशात आणि राज्यात आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने अंबेजोगाईत १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

या वर्षी या अन्नत्याग आंदोलनात देशभरातील किसानपुत्र सहभागी होणारच आहेत, तसेच विदेशात गेलेली भारतातली मुले-मुलीही सहभागी होणार आहेत. ‘अन्नदात्याच्या सलामतीसाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग’ हे या आंदोलनाचे साधे सूत्र आहे. अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या अन्नत्याग आंदोलनात सातत्याने ज्येष्ठ नागरिक मंच, योगेश्वरी रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी, वकील संघ अंबेजोगाई, मराठी पत्रकार परिषद शाखा अंबेजोगाई, मानवलोक अंबेजोगाई, अक्षर मानव शाखा अंबेजोगाई, आधार माणुसकीचा, मसाप शाखा अंबेजोगाई, ज्येष्ठ नागरी मंच महिला आघाडी, हेमंत राजमाने बहुउदेशीय सेवाभावी संस्था, स्वाभिमानी संघटना अंबेजोगाई, शिवसेना तालुका शाखा अंबेजोगाई, बेटी बचाव अभियान, त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान या व इतर संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अमर हबीब, सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, बालासाहेब कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च, १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या मानली जाते. या घटनेपासून आजपर्यंत अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंंदोलनात किसानपुत्रांनी आपला राजकीय अभिनवेष बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली, पण धोरणे बदलले नाहीत. त्याच जाचक कायद्यांच्या बेड्यांत शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून १९ मार्च रोजी सातत्याने अंबेजोगाईत हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

Web Title: Participation of various organizations in the hunger strike movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.