परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:00 IST2025-08-18T13:59:07+5:302025-08-18T14:00:04+5:30

ग्रामस्थांसह आयपीएस अधिकारी आणि पोलिस स्वतः उतरले पाण्यात, वाचवले जीव

Parli shocked! Jeep washed away in flood while returning from wedding; Three rescued, one dies | परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू

परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू

परळी (जि. बीड) : परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथे रविवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत पुण्याचा विशाल बल्लाळ (२३) या तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. लग्न समारंभावरून परतताना मुसळधार पावसामुळे पुलावरून ओसंडून वाहणाऱ्या पुरात जीप थेट पाण्यात शिरली. यात चारजण वाहून गेले, त्यापैकी तीनजण ग्रामस्थ, पोलिस, महसूल प्रशासनाच्या अथक प्रयत्नांतून सुखरूप वाचले, मात्र एकाचा दुर्दैवी बळी गेला.

रविवार रात्री ११.३० च्या सुमारास अमर पौळ (२५), राहुल पौळ (३०), पुण्याचा राहुल नवले (२३) आणि विशाल बल्लाळ (२३) हे चौघे जीपने डिग्रसकडे निघाले होते. मुसळधार पावसामुळे पुलावरून प्रचंड पाणी वाहत होते. अंधारात प्रवाह न दिसल्याने जीप थेट पाण्यात शिरली. पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने क्षणार्धात वाहन वाहून गेले. काहींनी झाडांच्या फांद्यांना धरून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थ व प्रशासनाची जीव धोक्यात घालून मदत
अपघाताची माहिती मिळताच महसूल व पोलीस यंत्रणा तसेच डिग्रस, कौडगाव हुडा, पिंपरी येथील ग्रामस्थ धावून आले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या धाडसी प्रयत्नांनंतर अमर पौळ याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, त्यांचे अंगरक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी पाण्यात उतरून आणखी एकाला वाचवले.

सकाळी पुन्हा शोधमोहीम
सोमवारी सकाळी उजेड पडताच परळी नगरपरिषद अग्निशमन दल, बीड SDRF, भोई समाजाचे पोहणारे युवक व ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. यावेळी राहुल पौळ आणि राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. परंतु विशाल बल्लाळ बेपत्ता राहिला. अखेर दुपारी १२.१५ च्या सुमारास घटनास्थळापासून तब्बल २ किमी अंतरावर त्याचा मृतदेह आढळला.

तत्परता आणि मदतकार्य
घटनेनंतर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, स्थानिक प्रशासन व जनप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार एनडीआरएफ टीम पुण्याहून रवाना करण्यात आली होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बीड तसेच आमदार धनंजय मुंडे यांनी सतत संपर्क ठेवून आवश्यक मार्गदर्शन केले. ग्रामस्थांचा धाडसी सहभाग लक्षवेधी ठरला. दत्तात्रय गव्हाणे, दिलीप राठोड, राम बोरखडे, अशोक कदम, ओम गव्हाणे, प्रदीप पवार, बाळासाहेब राठोड यांच्यासह अनेकांनी पुरात उतरून बचाव मोहिमेत जीव धोक्यात घालून हातभार लावला.

Web Title: Parli shocked! Jeep washed away in flood while returning from wedding; Three rescued, one dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.