चोरट्यांना पकडण्यासाठी परळी पोलीस बनले पालिका कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:13 IST2018-10-27T18:11:13+5:302018-10-27T18:13:15+5:30
चोरटेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि सहा महिन्यांपूर्वी प्रवाशाला लुटलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

चोरट्यांना पकडण्यासाठी परळी पोलीस बनले पालिका कर्मचारी
बीड : गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या क्लूप्त्या अवलंबतात. अशीच शक्कल लढवून परळी संभाजीनगर पोलीस चोरट्यांना पकडण्यासाठी पालिका कर्मचारी बनले. चोरटेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि सहा महिन्यांपूर्वी प्रवाशाला लुटलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
शेख हैदरअली लियाकत अली (२७), खाजातांबो छोटूमिया तांबोळी (२२ रा.परळी) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. एप्रील महिन्यात जगन्नाथ यादव (रा.खडका ता.सोनपेठ) हे पुण्याला जाण्यासाठी परळीला आले. रेल्वेस्थानकाकडे जात असताना त्यांचा दुचाकीला धक्का लागला. यावेळी दोघांनी भरपाई करून दे म्हणत त्यांना दुचाकीवरून दुर नेले. निर्जनस्थळी नेऊन त्यांच्याजवळी २४ हजार रूपये आणि मोबाईल घेऊन पसार झाले. त्यानंतर पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. मात्र ते हाती लागत नव्हते.
शुक्रवारी पोलिसांनी शक्कल लढवून ‘नगर पालिकेतून बोलत आहे, तुम्हाला घरकुल लागले आहे, पालिकेत या’ असे म्हणून कॉल केला. अवघ्या दहा मिनिटांत ते पालिकेत आले आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालत दोघांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सपोनि सलीम पठाण, सानप, आचार्य, गित्ते, सिरसाट यांनी केली.