पानटपऱ्या 'लॉक', तर हॉटेल, बारचे शटर 'डाऊन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:47+5:302021-03-14T04:29:47+5:30
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता रविवारपासून जिल्ह्यातील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपऱ्या, खानावळ बंद करण्यात येणार आहेत, ...

पानटपऱ्या 'लॉक', तर हॉटेल, बारचे शटर 'डाऊन'
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता रविवारपासून जिल्ह्यातील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपऱ्या, खानावळ बंद करण्यात येणार आहेत, तसेच १८ मार्चपासून सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉलही बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शनिवारी याबाबत आदेश काढले.
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज १५० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तसेच नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन करूनही आणि दंडात्मक कारवाया केल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी थोडी कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. अगोदर जिल्ह्यातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांना कोरोना चाचण्या बंधनकारक केल्यानंतर आता अस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट, खानावळ, चहाचे हॉटेल, पानटपरी यांचा समावेश आहे. येथून केवळ पार्सल सुविधेला परवानगी असणार आहे, तसेच १८ मार्चपासून सर्व मंगल कार्यालये आणि फंक्शन हॉलही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच्या तपासणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे.
भाजी, फळेविक्रेत्यांना मास्क बंधनकारक
जिल्ह्यातील भाजीपाला व फळेविक्रेत्यांना मास्क बंधनकारक असणार आहे. जे विक्रेते विनामास्क अथवा कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाया करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दुकानदार, कामगारांची प्रत्येक १५ दिवसाला चाचणी
जिल्ह्यातील सर्व दुकानदार व इतर आस्थापनाचालक आणि त्यांचे कर्मचारी व कामगारांची प्रत्येक १५ दिवसाला कोरोना चाचणी केली जाणार आहे. चाचणीचा अहवाल प्रत्येकाने जवळ ठेवणे बंधनकारक असेल. या सर्वांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक असेल. जे नियम तोडतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी
जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. केवळ मेडिकल, दूधवाले, अत्यावश्यक किराणा यांनाच परवानगी राहणार आहे. याबाबत सर्वांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यासही संबंधितांना सांगितले आहे.