सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:58 IST2025-02-05T15:58:06+5:302025-02-05T15:58:35+5:30

पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीवरून धस यांना अप्रत्यक्षरीत्या टोलाही लगावला.

Pankaj's first response to Suresh Dhas' biggest allegation; Referring to Bajrang Sonawane, she said... | सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या...

सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या...

BJP Pankaja Munde: आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खुंटेफळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगद्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. तसंच विधानसभा निवडणुकीत मला मदत न करता अपक्ष उमेदवाराला मदत केली, या सुरेश धस यांच्या आरोपालाही पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं. "सुरेश अण्णा... मी अजूनही तुम्हाला अण्णा म्हणते, पण तुम्ही मला ताईसाहेब म्हणत नाहीत. आमच्याकडून तरी नातं अजूनही तसंच आहे," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसंच यावेळी पंकजा यांनी लोकसभा निवडणुकीवरून धस यांना अप्रत्यक्षरीत्या टोलाही लगावला.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीच्या व्यासपीठावर असणाऱ्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझा पराभव करून जे बीड जिल्ह्याचे खासदार झाले आहेत ते बजरंग बाप्पा." पंकजा मुंडे यांनी केलेल्या या उल्लेखानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या जनसमुदयाकडून जोरदार प्रतिसाद आला आणि टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या. त्यानंतर आमदार सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख करताना पंकजा मुंडे यांनी या बाबीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत म्हटलं की, "मुख्यमंत्री साहेब बघा... राष्ट्रवादीच्या खासदारच्या नावासाठीही भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या जास्त वाजत आहेत."

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे लोकसभेतील निकालाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंचं काम न करताना बजरंग सोनवणे यांचं काम केल्याचा आक्षेप पंकजा समर्थकांनी यापूर्वी अनेकदा मांडला आहे. त्यातच आज स्वत: पंकजा मुंडे यांनीही सूचक वक्तव्य करत त्या आक्षेपाला जाहीरपणे बळकटी दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

"बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही"

"पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत मला मदत न करता अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना मदत केली," असा आरोप सुरेश धस हे निवडणूक निकालापासून करत होते. आजपर्यंत या आरोपीला प्रत्युत्तर न देणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज मात्र यावर भाष्य केलं. "मेरा वचनही मेरा शासन है" हा बाहुबली सिनेमातील डायलॉग म्हणत मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही, असं पंकजा मुंडेंनी धस यांना उद्देशून म्हटलं.

Web Title: Pankaj's first response to Suresh Dhas' biggest allegation; Referring to Bajrang Sonawane, she said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.