परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:56 IST2019-01-12T15:55:17+5:302019-01-12T15:56:05+5:30
त्याची बंदोबस्तात हर्सूल कारगृहात रवानगी करण्यात आली.

परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
बीड : हातभट्टी दारू तयार करून तीची विक्री करणाऱ्या एकावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे. ही कारवाई शनिवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केली आहे.
त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) असे कारवाई केलेल्या दारू विक्रत्याचे नाव आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्रिंबकही परळी तालुक्यात सर्रास हातभट्टी दारू तयार करून तो विक्री करायचा. तसेच त्याचा व्यापारही करायचा. त्याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले होते. वारंवार कारवाई केल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही. हाच धागा पकडून पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी त्रिंबकचा प्रस्ताव तयार केला.
अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत तो जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्याकडे पाठविले. त्यांनी चौकशी करून त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्याला शनिवारी स्थानबद्ध केले आणि त्याची बंदोबस्तात हर्सूल कारगृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश चाटे, सपोनि मारोती शेळके, पोउपनि कांबळे, आडे व त्यांच्या टिमने केली.