एक टन वजनाचे सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:09 IST2020-01-07T01:08:36+5:302020-01-07T01:09:15+5:30
तरुणाच्या अंगावर विंड कंपनीचा एक टन वजनाचा सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.

एक टन वजनाचे सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : शेतात चारण्यासाठी शेळ्या घेऊन गेलेल्या तरुणाच्या अंगावर विंड कंपनीचा एक टन वजनाचा सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.
पाटोदा तालुक्यातील चिखली येथील ऋ षिकेश दत्तात्रेय लाड याने आयटीआयचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले होतो. रविवारी तो शेळ्या चारण्यासाठी गावाजवळच दोन किमी अंतरावरील डुकर पट्टी परिसरात गेला होता.
दुपारी चारच्या सुमारास सचिन लाड व शिवाजी सुरवसे यांच्यासोबत जेवण केल्यानंतर शेळ्या जवळच्या शेतात गेल्या का हे पाहण्यासाठी ऋषिकेश शोध घेत होता.
वाटेत एशियन विंड मिल, चेन्नई येथील कंपनीने एक टनचे तीन ब्लॉक एकमेकांवर रचून ठेवलेले होते. ते अचानक ऋषिकेशच्या अंगावर पडल्याने त्याचा दबून मृत्यू झाला. शिवाजी सुरवसे, सचिन लाड यांना ही बाब कळताच त्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. ३० ते ४० ग्रामस्थांनी तो सिमेंट ब्लॉक लोखंडी पहारीच्या सहाय्याने ऋषिकेशच्या अंगावरून बाजूला केला. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
ऋषिकेशच्या मृत्यूला कंपनीचे धोरण जबाबदार
सदर कंपनीने पवनचक्की बनवण्यासाठी टेस्टिंग टॉवर उभे केले होते उभे करण्यासाठी सिमेंटचे मोठमोठे ब्लॉक तयार करून तारेचे ताण बांधले होते. काही दिवसांनी ते काम संपल्यानंतर तारा काढल्या. परंतु सिमेंटचे ब्लॉक तसेच एकावर एक रचलेले राहिले. याच ब्लॉकने ऋषिकेशचा बळी घेतला.
काम झाल्यानंतर वेळीच ब्लॉक हलविले असते तर ही घटना घडली नसती. त्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाचे चुलत बंधू तात्यासाहेब लाड यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात केली आहे.