देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळली; चालकासह महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:56 IST2023-11-28T13:55:04+5:302023-11-28T13:56:29+5:30
या अपघातात दोन भावंड गंभीर जखमी झाले आहेत

देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळली; चालकासह महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : शिर्डी येथून तुळजापुरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात झाडावर आदळली. या भीषण अपघातात चालकासह एक महिला जागीच ठार झाली. तर दोन भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील पोखरी येथे घडली.
शिर्डी येथील महिला आपल्या दोन मुलासह तुळजापुर येथे देवदर्शनासाठी आज सकाळी कारने ( क्रमांक एम.एच ०३,बी सी.६७३६ ) बीड नगर राष्ट्रीय महामार्गाने जात होत्या. दरम्यान, आष्टी मार्गे जात असताना सकाळी अकराच्या सुमारास चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्यानंतर कार रोड लगतच्या झाडावर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने या भीषण अपघातात चालक रूपेश बबन भेडे, अनिता राहुल इंगोले ( ३३ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अभय राहुल इंगोले ( १२), अनोप राहुल इंगोले ( १४, सर्व रा.शिर्डी ) हे दोघे भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. नगर व जामखेड येथील रूग्णालयात या दोन भावंडावर उपचार सुरू आहेत.
माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस हवालदार काळे, वाणी साहेब, कन्हेरे यांनी भेट देत पंचनामा करत चालक व महिलेचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.