भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:48 IST2023-12-19T13:48:34+5:302023-12-19T13:48:40+5:30
या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत

भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू
वडवणी : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या भावाच्या मुलाला बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसोबत जोरदार धडक झाली. यात भीषण अपघातात कारमधील मायलेकराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर झाला.
तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ याने मध्यरात्री विषारी द्रव्य प्राशन केले. हे लक्षात येताच त्याला उपचारार्थ बीड येथे कारमध्ये नेण्यात येत होते. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजता बीड-परळी महामार्गावरील पोखरी फाट्यावर कारची समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसोबत जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील रुग्णाची आत्या रत्नमाला केशव पवार, आत्याचा मुलगा प्रदीप केशव पवार हे दोघे जागीच ठार झाले. तर प्रमोद चव्हाण, नितीन व त्याची आई हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.