सेवा ज्येष्ठतेसाठी परिचारिकांची आरोग्य उपसंचालकांकडे कैफियत; आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:28 PM2020-02-28T13:28:09+5:302020-02-28T13:28:58+5:30

उपसंचालकांच्या कार्यालयापुढेच ठिय्या मांडण्याचा इशारा 

Nurses demands for the status of the Seniority to Deputy Director of Health for service | सेवा ज्येष्ठतेसाठी परिचारिकांची आरोग्य उपसंचालकांकडे कैफियत; आंदोलनाचा इशारा

सेवा ज्येष्ठतेसाठी परिचारिकांची आरोग्य उपसंचालकांकडे कैफियत; आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

बीड : बंधपत्रित परिचारिकांच्या मूळ दिनांकापासून सेवा नियमित करून सेवा ज्येष्ठतेचा लाभ देण्याच्या मागणीसाठी परिचारिकांनी लातूर उपसंचालकांकडे कैफियत मांडली आहे. मागण्या मान्य न झाल्यास  २ मार्च रोजी उपसंचालकांच्या कार्यालयापुढेच ठिय्या मांडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यात बीडसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील परिचारिकांचा समावेश आहे.

२००५ सालच्या अगोदर ज्या परिचारिका बंधपत्रित होत्या, त्यांना रुजू झाल्यापासून सेवेत घेण्यात आले नव्हते. त्या जेव्हापासून नियमित झाल्या, तेव्हापासून त्यांची सेवा ज्येष्ठता दिली आहे. विशेष म्हणजे इतर विभागातील सर्वांना बंधपत्र झाल्यापासूनच ज्येष्ठता देण्यात आलेली असून केवळ लातूर विभागातच ती दिली नसल्याचे परिचारिकांनी निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालकांना निवेदने देण्यात आली. परंतु अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. याबाबत त्यांनी २२ जानेवारीलाच संचालकांना उपोषणाबाबत निवेदन दिले होते. परंतु काहीच न झाल्याने त्यांनी बुधवारी उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांची लातूरला जावून भेट घेत समस्या मांडल्या. आता या परिचारिकांनी आक्रमक स्वरूप धारण केले असून २ मार्चला लातूरच्या उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे, सत्वशीला मुंडे, शाईन मॅथ्यू, सुरेखा लष्करे, नीलेश जाधव, पूनम धनवटे, रंजना दाणे, जान्हवी दुदवडकर, अनंत वायझोडे, मीनाक्षी ठोकळ, वैशाली गुरव, मंगेश शिरसाट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपसंचालक (नर्सिंग) डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी फोन घेतला 
नाही.

वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला
परिचारिकांचे निवेदन मिळाले आहे. यावर कारवाई करण्याबाबत शिफारस करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सकारात्मक कारवाई करून लवकरच निर्णय घेण्यात येईल. 
    - डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर

... तर २ मार्चला उपोषण करू
वारंवार निवेदन दिले. परंतु अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. आता २ मार्चला उपोषण करण्याबाबत आम्ही २२ जानेवारीलाच निवेदन दिले आहे. आमच्या मागण्या मान्य करून अन्याय दुर करावा, एवढीच अपेक्षा आहे. 
    - सत्वशिला मुंडे, उपाध्यक्षा,  महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना
 

Web Title: Nurses demands for the status of the Seniority to Deputy Director of Health for service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.