सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संख्या आठवर, अद्यापही कृष्णा आंधळे मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:46 IST2025-01-06T16:45:38+5:302025-01-06T16:46:39+5:30
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संख्या आठवर, अद्यापही कृष्णा आंधळे मोकाट
केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याच्यासह देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी रात्री बीड पोलिसांनी बेड्या ठाेकल्या. दोघे पुण्यातून तर एकाला कल्याणमधून अटक केली. आता या प्रकरणात आरोपींची संख्या आठ झाली असून, अजूनही कृष्णा आंधळे मोकाटच आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील चौघे अटकेत होते. परंतु सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीनही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर त्यातील घुले व सांगळे यांना शनिवारी पहाटे पकडण्यात यश आले आहे. आंधळे अजूनही फरार आहे, तर दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी झाला आहे. एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.
डॉक्टरकडून मिळाले आरोपींचे लोकेशन
सुदर्शन घुले व इतरांना आर्थिक मदत पुरविल्याचा व आरोपीशी भ्रमणध्वनीवरून संपर्कात असल्याचा ठपका ठेवून केज येथील डॉ. संभाजी वायबसे यांना एसआयटी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नांदेडमधून ताब्यात घेतले होते. त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी आणले होते. त्यांची केज येथील शासकीय विश्रामगृहात दोन तास व पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशी केल्यानंतर फरार आरोपींचे लोकेशन मिळाले. त्यावरून पुण्यातील बालेवाडी स्टेडियम परिसरातील एका खोलीतून घुले व सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतले. आता डॉ. संभाजी वायबसे यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.
दोनवेळा वैद्यकीय तपासणी
पुणे येथून तिन्ही आरोपींना शनिवारी सकाळी जिल्ह्यात आणले. केजला नेण्यापूर्वी त्यांची नेकनूर स्त्री रुग्णालयात सकाळी १० वाजता डॉ. यमपुरे यांनी वैद्यकीय तपासणी केली. नंतर नेकनूर पोलिस ठाण्यात जबाब घेतले. तेथून केजला आणल्यावर उपजिल्हा रुग्णालयात दुपारी ४.४५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी तपासणी केली.
सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रथमत: सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचा समावेश झाला. आता घुले याला सरपंच देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपावरून मस्साजोग येथील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे यालाही सीआयडीच्या पथकाने आठवा आरोपी केले.
तिघांनाही १५ दिवसांची पोलिस कोठडी
घुले, सांगळे आणि सोनवणे या तिनही आरोपींना शनिवारी दुपारी ३ वाजता केज येथील न्यायालयात हजर केले. न्या. पावसकर यांनी तिघांनाही १५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर आरोपीच्या वतीने ॲड. ए. व्ही. तिडके यांनी काम पहिले. दुपारी ४.४५ वाजता या तिघांनाही पोलिस वाहनातून बंदोबस्तात बीडला नेण्यात आले. यावेळी पोलिसांचा न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.