बीडमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या घटली, २०१९ मध्ये १८८ तर २०२० मध्ये ३९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:44+5:302021-02-05T08:26:44+5:30
बीड : जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत डेंग्यूची रुग्णसंख्या खूपच कमी झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने केलेले योग्य नियाेजन ...

बीडमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या घटली, २०१९ मध्ये १८८ तर २०२० मध्ये ३९
बीड : जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत डेंग्यूची रुग्णसंख्या खूपच कमी झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने केलेले योग्य नियाेजन आणि नागरिकांनी घेतलेली काळजी, यामुळे ही रुग्णसंख्या घटली आहे. वेळेवर सर्वेक्षण करून धूरफवारणी, गप्पी मासे साेडले जात असल्याने डेंग्यू डासांची उत्पत्नी थांबून त्याला प्रतिबंध करण्यात यश आले आहे. २०१९ मध्ये तब्बल १८८ रुग्ण आढळले होते तर २०२० मध्ये केवळ ३९ सापडले आहेत.
बीड शहरात २३ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र तयार केलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही असे केंद्र तयार करून त्यातील मासे दूषित पाण्यात सोडले जातात. नागरिकांना आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही केले जाते. याला प्रतिसादही मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग व त्यांचे पथक यासाठी काम करीत आहे.
जनजागृतीसह कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
डेंग्यूबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. तसेच नियमित सर्वेक्षण करणे, डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पीमासे साेडणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, दूषित कंटेनरमध्ये अळीनाशकाचे द्रावण टाकणे, कोरडा दिवस पाळणे, आरोग्य शिक्षण देणे, धूरफवारणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप रुग्णांचा कर्मचाऱ्यांमार्फत नियमित आढावा घेतला जात आहे. आरोग्य विभागाच्या या नियोजनामुळे साथरोग कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तसेच नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी, मळमळ होणे आणि उलट्या होणे, सांधेदुखी, स्नायूंतील वेदना आणि डोळ्यांच्या मागे वेदना, अशक्तपणा येणे, चवीच्या संवेदनांमध्ये बदल आणि भूक कमी होणे, हिरड्यांत रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी दरम्यान असामान्यपणे रक्तस्त्राव होणे आणि मूत्रात रक्त येणे यासारख्या सौम्य रक्तस्त्रावाची लक्षणे दिसतात.
चिकुनगुनियाचे रुग्णही घटले
मागील चार वर्षांत चिकुनगुनियाचे रुग्णही घटले आहेत. २०१७ साली जिल्ह्यात १३६ रुग्ण आढळले होते. नंतर १८ मध्ये ३९, १९ मध्ये ४५ तर २०२० मध्ये ३६ रुग्ण आढळले. एकूणच आढावा घेतला असता जिल्ह्यात साथरोग नियंत्रणावर आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसत आहे.
कोट
जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहे. साथरोग पसरू नये, यासाठी सर्वेक्षण, धूरफवारणी, गप्पी मासे साेडणे, जनजागृती करणे, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जाते. नागरिकही सहकार्य करीत आहेत.
डॉ. मिर्झा बेग, जिल्हा हिवताप अधिकारी, बीड