आता आम्ही लक्ष घालणार, उद्धव ठाकरे बीडला जाणार; संजय राऊतांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:23 IST2025-02-19T13:22:46+5:302025-02-19T13:23:25+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आता आम्ही लक्ष घालणार, उद्धव ठाकरे बीडला जाणार; संजय राऊतांची माहिती
Shiv Sena Sanjay Raut: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील लवकरच बीड दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, "आम्ही शिवसेनेचे सर्व नेते लवकरच बीडला जाणार आहोत. आमची काल बैठक झाली. त्यात आम्ही सर्वजण बीडला जाण्याचं निश्चित केलं आहे. आम्ही गेल्यानंतर उद्धव ठाकरे तिकडे जातील. आम्ही देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहोत. कारण आतापर्यंत शिवसेना वाट पाहात होती, आम्हाला असं वाटलं होतं की सुरेश धस यांच्यासह इतर प्रमुख नेते या विषयात आवाज उठवत आहेत, वाचा फोडत आहेत आणि संघर्ष करत आहेत. पण हा सगळा घोटाळा आणि घोळ होत असल्याचं लक्षात आल्याने शिवसेनेला यात लक्ष घालावं लागेल, असं आम्हाला वाटत आहे," अशी भूमिका राऊत यांनी मांडली.
"सुप्रियाताई सुळेही काल तिथं जाऊन आल्या आहेत. कारण देशमुख कुटुंब खऱ्या अर्थाने पोरकं झालं आहे. त्या दोन मुलांची, त्या विधवा पत्नीची, त्या आईची फसवणूक झालीय, ही आमची भावना आहे," असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
मस्साजोग इथं मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी इथे भाषण करायला आलेली नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहे. वैभवी कोणाची तरी लेक आहे, मीही कोणाची तरी लेक आहे. आपल्या मुलाचे निधन आईसाठी सर्वांत मोठं दु:ख आहे. मी यापूर्वी माझ्या मावशीच्या मुलाला लहान वयात गमावलं आहे. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असली तरी माझी मावशी आजही सावरू शकलेली नाही," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.