ना मास्क.. ना सॅनिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:10+5:302021-03-06T04:31:10+5:30
रियालिटी चेक परळी रेल्वेस्थानक : प्रवाशांचे आरोग्य धोक्यात संजय खाकरे परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची काळजी घेतली जाते ...

ना मास्क.. ना सॅनिटायझेशन
रियालिटी चेक
परळी रेल्वेस्थानक : प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
संजय खाकरे
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची काळजी घेतली जाते का, यासंदर्भात पाहणी केली तेव्हा येथील रेल्वेस्टेशनमधून धावणाऱ्या नांदेड -पनवेल या विशेष रेल्वे गाडीतील आरक्षित डब्यात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत नाही व मास्कचाही वापर अनेक प्रवासी करीत नसल्याचे बुधवारी रात्री आढळून आले, तसेच सोशल डिस्टन्सचा अनेक रेल्वेंच्या डब्यात अभाव आढळून आला. रेल्वेगाडीत व रेल्वेस्टेशन परिसरात विनामास्क फिरणारे अनेक प्रवासी आढळून येत आहेत. त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली नाही, असे समजते.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून अनेक रेल्वे परळीमार्गे धावत आहेत. मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेप्रवासी गाड्या बंद होत्या. त्यापैकी अनेक गाड्या आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असताना रेल्वेत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दंडात्मक कार्यवाही करण्यात येत नाही. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदेडहून पनवेलकडे निघालेली रेल्वेगाडी परळी रेल्वेस्थानकात थांबली होती. या गाडीतील एसी डबा वगळता इतर डब्यात अनेक प्रवाशांनी चेहऱ्याला मास्क लावलेला नव्हता. डब्यात सॅनिटायझरचा वापर केलेला नव्हता. काही प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क लावलेले आढळून आले. परळी रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वतीने सॅनिटायझरची सोय करण्यात आलेली नाही; परंतु परळी रेल्वे ठाण्यातील पोलीस मास्क लावण्यासंदर्भात पाहणी करीत होते.
नांदेड-पनवेल या रेल्वे गाडीतून आपण पुण्याला जात असून, रेल्वे डब्यात ८० टक्के प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसून आले. -कृष्णा कोंडेकर, प्रवासी, नांदेड
परळी रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोरोनाविषयक जगजागृती करण्यात येत आहे व रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेल्वे डब्यात जाऊन मास्क लावण्यासंदर्भात व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत. एस.एस.मीना, रेल्वे स्टेशन मास्तर, परळी.
परळीमार्गे शिर्डी- काकीनाडा, काकीनाडा शिर्डी, बंगळुरू-नांदेड, औरंगाबाद- हैदराबाद-पनवेल-नांदेड या विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत, तसेच आठवड्यातून एकदा कोल्हापूर-धनबाद ही रेल्वे सुरू झाली आहे.
===Photopath===
050321\05bed_7_05032021_14.jpg